माजी नगरसेवक बाबू नायर यांचा भाजप शहर सरचिटणीस पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा..

0
397

पिंपरी, दि. २(पीसीबी)- भाजपचे माजी नगरसेवक, पक्षाचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी आज (गुरुवारी) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. नायर यांनी भाजप सरचिटणीस पदावर काम केले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर भाजपने नायर यांना स्वीकृत नगरसेवक केले. परंतु, नायर यांनी आज अचानक शहर भाजपच्या सरचिटणीसपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सहकार्याबाबत कोअर कमिटी, पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, बाबू नायर पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून ते महापालिकेत स्वीकृत नगरसेवक देखील होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शहरातील दाक्षिणात्य संघटनांमध्ये बाबू नायर यांचे मोठे वजन आहे. केरळी बांधवांची लोकसंख्या शहरात सुमारे पाऊन लाखाच्या दरम्यान आहे. नायर यांच्या राजीनाम्याने भाजपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एक एक नगरसेवक तसेच पदाधिकारी भाजपाला रामराम करत असून गळती रोखण्यात भाजपा नेत्यांना अपयश आले आहे.