माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे यांच्याकडून खंडोबा देवाला मानाचा पंचकल्याणी अश्व अर्पण

0
377

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या अश्‍वाचे मानकरी व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे व पानसरे कुटुंबीय, जेजुरी ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांच्यावतीने श्री खंडोबा देवास ‘पंचकल्याणी अश्‍व’ अर्पण सोहळा येत्या बुधवारी (ता. २२) गुढीपाडव्याला जेजुरी येथे होणार आहे. हा अश्‍व पाहण्यासाठी भाविकांनी सोमवारी (ता. २०) हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स (एचए) कॉलनीत गर्दी केली होती.

पानसरे कुटुंबीय एचए कॉलनीत राहत असल्याने या अश्‍वाचे आज सकाळी आगमन झाले. या वेळी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक जितेंद ननावरे, माजी नगरसेविका अमिना पानसरे आदी उपस्थित होते.
हा पंचकल्याणी अश्‍व अकलूजवरून आणला आहे. आज (मंगळवारी) पूजा करून तो जेजुरीकडे रवाना करण्यात आला. तत्पूर्वी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात काही काळ अश्‍व थांबविण्यात आला होता. त्यानंतर जेजुरीकडे रवाना झाला. त्यानंतर पाडव्यादिवशी अश्‍वाची विधीवत पूजा करून श्री खंडोबा देवाच्या सेवेत अर्पण करणार असल्याचे महंमदभाई पानसरे यांनी सांगितले.

सुमारे १०० वर्षांपेक्षा जादा वर्षांपासून ही सेवा आमच्या घराण्याकडे आहे. सामाजिक विचारातून दिलेला हा अश्‍व असतो. माझ्या हयातीत हा सहावा अश्‍व श्री खंडोबा देवाला अर्पण करत आहोत, असे श्री खंडोबा अश्‍वाचे मानकरी महंमदभाई पानसरे म्हणाले.