माजी आमदार विवेक पाटील यांची १५२ कोटींची मालमत्ता जप्त, ईडी च्या कारवाईने शेकाप हादरला

0
361

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळचे आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून तब्बल १५२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या मालमत्तेसह बंगला तसेच रहिवाशी संकुलाचा समावेश आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सुमारे सहाशे कोटींचा हा बँक घोटाळा अनेक वर्षांपासून चर्चेत असून कारवाई होत नसल्याने सभासद संतापले होते.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे पाटील हे माजी अध्यक्ष आहेत. या बँकेच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पाटील तसेच त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालमत्तेचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बँक घोटाळा प्रकरणामध्ये 2020 मध्ये काही संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात विवेक पाटील यांच्यावरही घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपसा सुरु केला होता. तर याच प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बँकेत एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, ईडीने गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. यातच आता गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेकानंद पाटील यांची 152 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता या प्रकणात अजून पुढे काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे