माजी आमदार रूपलेखाताई ढोरे यांचे निधन

0
2

दि.२८(पीसीबी)- वडगाव मावळ येथील मावळच्या प्रथम महिला आमदार श्रीमती रूपलेखाताई खंडेराव (दादासाहेब) ढोरे (वय ७६) यांचे बुधवारी (दि २८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.भारतीय जनता किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज (भाऊ) ढोरे व उद्योजक सचिन (बाळा) ढोरे यांच्या त्या मातोश्री होत तर वडगावचे माजी सरपंच बाळासाहेब ढोरे यांच्या त्या चुलती होत.

१९९३ ते १९९५ त्या मावळ पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.१९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री मदन बाफना यांना पराभूत करून त्या मावळच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी राज्यातही भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे मावळ तालुक्यात अनेक विकास कामांना त्यांनी गती दिली. मावळ तालुक्यातील पंचवीस वर्षांच्या भाजप राजवटीचा पाया रुपलेखाताईंच्या काळात घातला गेला.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. संस्थेच्या सल्लागार म्हणून त्यापुढे कार्यरत होत्या. अलीकडे प्रकृती अस्वस्थ त्यामुळे त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५:०० वाजता वडगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.