माजी आमदार, मंत्री पद्माकर वळवी यांचा कॉंग्रेसला झटका! भाजपमध्ये प्रवेश

0
168

काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त महाराष्ट्रात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे नंदुरबारमध्ये राहुल गांधींनी सभा घेतली, त्याला २४ तास उलटत नाहीत, तोच नंदुरबार जिल्ह्यातील बडे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी टाईमिंग साधलं. वळवींनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करुन राज्यसभेवर गेलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वळवींचा पक्षप्रवेश झाला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससाठी हा आणखी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने अद्याप महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. विद्यमान खासदार हीना गावित यांना नंदुरबारमधून पुन्हा एकदा संधी मिळणार की डच्चू मिळणार याची चर्चा रंगली आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचा हात हाती धरला आहे.

कोण आहेत पद्माकर वळवी?

पद्माकर वळवी हे २००९ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले होते. पद्माकर वळवी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यांच्यावर क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी होती. तर नंदुरबारच्या पालकमंत्रिपदाची धुराही त्यांच्याकडे होती. मात्र २०१४ मध्ये वळवींना पराभवाचा धक्का बसला. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यांपैकी ते एक मानले जात. पद्माकर वळवी यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या आहेत.