
- दुपारी ३ वाजता वैकुंठ स्मशानात अंत्यसंस्कार
पुणे, दि. २४ –
शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रतिशिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार (दि 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेतर्फे 1996 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. शिरगाव शिर्डी येथे त्यांनी साईबाबांची प्रतिशिर्डी उभी केली. अन्नछत्र उभारले. अनेक संस्था आणि संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.
विलासराव देशमुखांना केलं होतं पराभूत
विधानपरिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांना पराभूत केल्याने प्रकाश देवळे प्रकाशझोतात आले होते. पण नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत प्रतिशिर्डीच्या विकासासाठीच स्वत:ला वाहून घेतलं होतं. देवळे यांच्या निधनामुळे प्रतिशिर्डीच्या भक्त परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतिशिर्डी हे मोहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरगाव येथील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे शिर्डी साईबाबा मंदिराचे प्रतिबिंब म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे त्याला “प्रतिशिर्डी” असे नाव पडले आहे. शिर्डीला जाण्यासाठी वेळ नसल्यास हे ठिकाण श्रद्धालांसाठी उत्तम पर्याय आहे, कारण येथील मंदिर शिर्डीच्या मंदिराची नेमकी प्रतिकृती आहे. येथील मंदिरातील भिंतींचा रंग, वास्तुकला, मूर्ती आणि वातावरण सर्व काही अगदी शिर्डीत अल्यासारखं वाटावं असं आहे.