पुणे, दि. २० : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र, मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांची कन्या माजी नगरसेविका सायली, माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील २२ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा आज दुपारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हे प्रवेश पार पडले. केंद्रीय मंत्री मुरली मोहळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे शहराध्यक्ष रवी घाटे, पुण्यातील भाजपचे नेतेही या वेळी उपस्थित होते.खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती; तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांतील सुमारे २२ माजी नगरसेवकांसह इतर पक्षांतील प्रमुख पदाधिकार्यांचा पक्ष प्रवेश मुंबईतील छोटेखानी कार्यक्रमात होणार आहे.
सुरेंद्र पठारेंचा प्रवेश –
विधानसभेला भाजपमध्ये असणारे बापू पठारे यांनी उमेदवारी मागितली होती. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने पठारे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत विधानसभा लढवली आणि ते विजयी झाले होते. पठारे पिता-पुत्रांनी त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन भाजपचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जोरदार प्रचार केला होता; तसेच त्यांच्या प्रभागातून त्यांना मताधिक्यही देण्यात आले होते. त्यामुळे पठारे कुटुंबाची भाजपशी जवळीक कायम होती. त्यानुसार सुरेंद्र पठारे यांनी भाजपची आपली जुनी नाळ अधिक घट्ट करीत प्रवेशाचा मार्ग स्वीकारल्याचे निकटवर्तीय सांगतात. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरेंद्र यांचा प्रवेश होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.















































