माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा

0
22

देहू दि. २३ (पी.सी.बी) : श्री क्षेत्र देहूगाव : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे चिंतन स्थळ असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर दिनांक २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्यात विविध धार्मिक आणि अध्यात्मिक, सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.

मावळ तालुक्यातील श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह होतो. यानिमित्ताने पहाटे काकड आरती, त्यानंतर सकाळी गाथा पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन आणि जागर असे विविध कार्यक्रम नियमितपणे होत असतात. हभप नाना महाराज तावरे यांच्या उपस्थितीमध्ये गाथा पारायण होत असते. सोहळ्याची सुरुवात रविवारी होणार आहे. सकाळी महापूजा होईल. त्यादिवशी रात्री आठ वाजता यशोधन महाराज साखरे, सोमवारी जयंत महाराज बोधले, मंगळवारी उद्धव महाराज मंडले, बुधवारी चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुवारी एकनाथ आबा वास्कर महाराज, शुक्रवारी न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री महाराज, शनिवारी वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होईल. रविवारी सकाळी दहा वाजता सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल. सोहळ्याच्या निमित्ताने दररोज सायंकाळी साडेचार वाजता ह भ प डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे संत ‘तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा अभंग चिंतनाचा कार्यक्रम होईल.

असा आहे दशमी सोहळा
माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी महापूजा, गाथा पारायण, दुपारी बारा वाजता गणेश शिंदे आणि प्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचा ‘तुका आकाशाएवढा’ हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम साजरा होणार आहे. तसेच दुपारी दीड वाजता डॉ रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्यावतीने डॉ भावार्थ देखणे यांचा बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
….
भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, ”संतभूमी श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर भव्य असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मंदिर होत आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे हे जगातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे. या मंदिराचे काम सुरु आहे. त्यासाठी भाविकांनी हातभार लावावा, आपापल्या पद्धतीने योगदान द्यावे.’