मागील वर्षात २.३४ लाखांवर विक्रमी नवीन वीजजोडण्या

0
155

-महावितरणची पुणे परिमंडलामध्ये वेगवान कामगिरी

पुणे, दि. ८ (पीसीबी) : नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत सन २०२३ मध्ये सर्व वर्गवारीमध्ये विक्रमी २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. सन २०२२ च्या तुलनेत तब्बल ५७ हजार ५७९ अधिक वीजजोडण्या दिल्या आहेत. एका वर्षात दोन लाखांपेक्षा अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची पुणे परिमंडलाने प्रथमच कामगिरी केली आहे.

पुणे परिमंडलामध्ये दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र मागीलवर्षी जानेवारीपासून वीजजोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकसेवा गतीमान करण्यासोबतच प्रामुख्याने नवीन वीजजोडण्यांना आणखी वेग देण्याची सूचना केली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही राहणीमान सुलभता (Ease of Living) प्रमाणे ग्राहकसेवा गतिमान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.

नवीन वीजजोडण्यांसाठी मीटरचा आवश्यकतेनुसार व तात्काळ पुरवठा व्हावा यासाठी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मागील जानेवारीपासून दर आठवड्यामध्ये दोनदा विभागनिहाय नवीन वीजजोडण्या व मीटर उपलब्धता याबाबत आढावा घेणे सुरु केले आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाला व जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये तब्बल २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. या तुलनेत सन २०२२ मध्ये एकूण १ लाख ७७ हजार २३१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या होत्या.

सन २०२३ मध्ये घरगुती- १ लाख ९८ हजार ६५९, वाणिज्यिक- २६ हजार ८६६, औद्योगिक- ३ हजार ७६८ आणि कृषि व इतर ५५१७ अशा एकूण २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये पुणे शहरात १ लाख ४४१, पिंपरी चिंचवड शहरात ७२ हजार ४६६ आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये ६१ हजार ९०३ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत यापूर्वी दरमहा १५ ते १६ हजार वीजजोडण्या देण्याचा वेग होता तो आता सन २०२३ मध्ये १९ हजार ५५० वर गेला. तर मागील एप्रिलपासून हा वेग २० हजार १०० वर गेला आहे.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – सन २०२३ मध्ये २.३४ लाखांवर नवीन वीजोडण्या देण्यात आल्या ही पुणे परिमंडलासाठी समाधानाची व आनंदाची बाब आहे. हा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.