मांजरीची पिल्ले समजून आणली बिबट्याच्या पिल्ले…

0
479

धुळे, दि. २ (पीसीबी) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा मुक्या जनावरांवर जीव असतो. अनेकजण मुक्या प्राण्यांना खूप जीव लावतात, त्यांच्यावर अफाट प्रेम करतात. घरातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. एकंदरीत त्या पाळीव प्राण्याचे संपूर्ण पालनपोषण करतात. मात्र हे करत असताना आपण कोणत्या प्राण्याला लळा लावतोय हे कळालं नाही तर? असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय. लहान मुलांनी चक्क बिबट्याच्या पिल्लांना लळा लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
धुळ्यातील नाणे सिताने या गावामध्ये लहान मुलांनी मांजरीची पिल्लं म्हणून चक्क बिबट्याच्या पिल्लांना लळा लावला. शेतात काम करताना मजुरांना दोन पिल्ले दिसली. या वेळेस त्यांना वाटलं की, मांजरीची पिल्ले आहेत. घरी आणल्यावर मजुरांच्या लहान मुलांचं मन या पिल्लांमध्ये रमलं पण, ही पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची असल्याचं समजताच त्यांना धक्का बसला. बिबट्याची पिल्ले घरी आणल्यावर गावात एकच चर्चा सुरु झाली. त्यानंतर, या मजुरांना समजल्यावर ज्या ठिकाणाहून ही पिल्ले आणली होती, त्याच ठिकाणी परत नेऊन ठेवली. जंगलात सापडलेल्या जागी पिल्लांना ठेवल्यानंतर पिल्लांच्या आईने मुलांसह रात्री हे ठिकाण सोडल्याचा प्रकार वनविभागाच्या कॅमेरात कैद झाला आहे.

बिबट्याची पिल्ले आहेत कसं कळलं?
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्याती नाहील नाणे सिताने या गावात शेतकरी काशिनाथ माळी यांच्या शेतातील मजुरांच्या मुलांना ही दोन पिल्लं दिसली. त्यानंतर ते या पिल्लांसोबत खेळले आणि नंतर या पिल्लांना ते काशिनाथ माळी यांच्या शेतातील शेडमध्ये घेऊन आले. मात्र, शेतमालक काशिनाथ माळी हे सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना ही बिबट्याची पिल्ले असल्याचे लक्षात आले, त्यांनी याबाबत तात्काळ वनविभागाला कळवलं.