महिलेला जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न

0
53

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी)

किरकोळ कारणावरून झालेल्‍या भांडणानंतर एका तरुणास मारहाण करण्‍यात आली. त्‍यावेळी भांडण सोडविण्‍यासाठी तरुणाच्‍या आईच्‍या डोक्‍यात कोयत्‍याने मारहाण करीत जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. ही घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्‍या सुमारास शरदनगर, निगडी येथे घडली.

सचिन संतोष गायकवाड, मारूती हिरामण धांडे आणि सचिन बाळू धांडे (सर्व रा. एसआरए बिल्‍डिंग, शरदनगर, निगडी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. अनिल अशोक पिटेकर (वय ३१, रा. शरदनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच लिफटमधून चालले होते. त्‍यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला नीट उभा रहा, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्‍या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी व त्‍यांच्‍या आईला जिवे मारण्‍याच्‍या उद्‌देशाने आरोपी सचिन गायकवाड याने कोयत्‍याने व इतर दोन आरोपींनी लाकडी दांडक्‍याने फिर्यादी यांच्‍या आईच्‍या डोक्‍यात मारून तिला जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.