कळंब परिसरात उघडकीस आलेल्या महिलेच्या हत्येच्या घटनेत नवी आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीने दिलेल्या कबुलीमुळे पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. मृत महिलेचे नाव मनीषा बिडवे असून तिच्या हत्येनंतर आरोपी दोन दिवस तिच्या मृतदेहाशेजारी राहिला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या खुनाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की मनीषा बिडवे यांच्या हत्येमागे अनैतिक संबंध आणि आर्थिक वाद हे कारण आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी आपली गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मनीषा यांचा काही संबंध होता का, यावर पोलिसांनी सध्या तपास सुरु असल्याने भाष्य करण्यास नकार दिला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात नवा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, मनीषा बिडवे या महिलेला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी वापरण्यात येणार होते. त्या पाच वेगवेगळ्या नावांनी वावरत होत्या, असा दावा त्यांनी केला. मनीषा बिडवे, मनीषा गोंदवले या नावांनी त्यांनी विविध ठिकाणी काम केल्याचेही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले. यामागे वाल्मिक कराड हे संपूर्ण कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, संबंधित महिला आधीच तयार ठेवण्यात आली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
मनीषा बिडवे या महिलेला ठार मारल्यानंतर आरोपीने मृतदेह ज्या खोलीत ठेवला, त्याच ठिकाणी दोन दिवस राहून जेवणदेखील केले. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यावर दुर्गंधी सुटली आणि त्यानंतर आरोपीने महिलेची दुचाकी घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे आरोपी रामेश्वर भोसले, केज येथील आपल्या मित्रासोबत पुन्हा त्या जागेवर आला आणि त्याला मृतदेह दाखवला.
रामेश्वर भोसले हा मनीषा बिडवे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. काही खासगी व्हिडिओ आणि फोटो दाखवत मनीषा बिडवे यांनी आरोपीला ब्लॅकमेल केल्याची माहिती भोसलेने पोलिसांना दिली आहे. 22 मार्च रोजी ही हत्या झाली असून त्यादिवशी महिलेने आरोपीला उठाबशा काढायला लावल्याचे तपासातून समोर आले आहे