महिलेचा गळा चिरून हत्या, शेताच्या बांधावर मृतदेह आढळला

0
2

दि. 22 (पीसीबी) – नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेताच्या बांधावर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडलीय आहे. सिंधुताई मारुती वाजे ( वय-५६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारुंगसे नामक शेतकरी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला असता त्यांना शेताच्या बांधावर गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत याची माहिती मुलगा धनंजय याला दिली. त्याने शेतावर येऊन पाहिले असता मृतदेह गावातील सिंधुताई वाजे यांचा असल्याचे समजले. याबाबतची माहिती धनंजयने गावातील नागरिकांना दिली. तसेच सिन्नर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच निफाड येथील पोलिस उपअधीक्षक डॉ. पालवे यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली. अधिक तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यातआले होते, तसेच ठसे तज्ज्ञांकडून परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी परिसरात मृत व्यक्तीच्या चपला आढळून आल्या तसेच मृतदेहाच्या कपड्यांमध्ये कुलपाची चावी सापडून आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

मयत सिंधुताई वाजे यांना मूलबाळ नाही. गेल्या काही वर्षांपासून डुबेरे येथे माहेरीच राहात होत्या. सिन्नर येथे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात काम करून उदरनिर्वाह करत होत्या. त्या रविवारी (दि.१९) सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास कामावरून घरी आल्या. त्यानंतर ७ च्या सुमारास घराकडून दुचाकीवर बसून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे. त्याआधारे तपासी अधिकारी मारेकऱ्यांची ओळख पटवून शोध घेत आहेत.