दि.१४(पीसीबी)-कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्याचा विचार करत एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दरम्यान दरवर्षी १२ विशेष सुट्ट्या देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.या निर्णयामुळे शासकीय तसेच काही खासगी संस्थांमध्ये कार्यरत महिलांना दर महिन्याला एक सुट्टी मिळणार आहे. यामुळे पाळीच्या काळात होणाऱ्या शारीरिक त्रासांमुळे महिलांवर कामाचा ताण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कर्नाटक सरकारचे हे पाऊल स्त्री सशक्तीकरण, आरोग्य संवर्धन आणि कामाच्या ठिकाणी महिलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक सकारात्मक टप्पा मानला जात आहे. पाळीच्या काळात अनेक महिलांना थकवा, पोटदुखी, अशक्तपणा, आणि मानसिक ताण जाणवत असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये विश्रांती मिळावी, हा या धोरणामागील मुख्य उद्देश आहे.
महिलांच्या आरोग्यावर चर्चा करण्यास पूर्वी संकोच मानला जात होता. मात्र, अशा निर्णयांमुळे समाजात मासिक पाळीविषयी खुलेपणा वाढेल आणि महिलांच्या गरजांकडे संवेदनशीलतेने पाहिलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.काही महिला अधिकारी, शिक्षिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत करताना सांगितले की, ही केवळ सुट्टी नाही, तर आमच्या वेदना आणि गरजांना सरकारकडून मिळालेली अधिकृत मान्यता आहे.
कर्नाटकचा हा निर्णय देशातील इतर राज्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. याआधी काही खासगी कंपन्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीची अंमलबजावणी केली होती, मात्र सरकारी स्तरावर अशी योजना लागू करणारे राज्य फारच कमी आहेत.कर्नाटक सरकारचा हा निर्णय महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी, त्यांच्या कामकाजातील सुसूत्रता राखण्यासाठी आणि एक समजूतदार समाज घडवण्यासाठी एक प्रगतिशील आणि संवेदनशील पाऊल ठरत आहे. भविष्यात इतर राज्यांनीही याचा अनुकरण करावं, अशी अपेक्षा महिलांमधून व्यक्त केली जात आहे.