महिला पोलिसाने दरोड्याचा डाव उधळला; चौघांना अटक

0
262

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पेट्रोल पंपावरील कॅश बँकेत जमा करण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीवर पिस्तूल रोखून रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली. महिला पोलीस कर्मचाऱ्याने दरोडेखोराला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत केली. ही घटना सोमवारी (दि. 26) दुपारी सव्वा एक वाजता बँक ऑफ महाराष्ट्र, आकुर्डी येथे घडली.

प्रमोद नामदेव चांदणे (वय 22), जयदीप मधुकर चव्हाण (वय 19), संतोष अभिमान चोथवे (वय 26, तिघे रा. मोरेवस्ती, चिखली), ताईतराव सुदाम कांबळे (वय 24, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल राजाभाऊ चौधरी (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सरस्वती काळे या सोमवारी दुपारी तुळजा भवानी मंदिराजवळ आकुर्डी येथे बंदोबस्तावर होत्या. फिर्यादी यांच्या पेट्रोल पंपावर जमा झालेली 11 लाख 95 हजार 970 रुपयांची रोकड ते बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत जमा करण्यासाठी जात होते. ते बँकेच्या पायऱ्या चढत असताना प्रमोद चांदणे याने अमोल यांना अडवले. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार बंदोबस्तावरील सरस्वती काळे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच बॅंकेजवळ धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने आरोपीला अटक केली. पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांच्या या कामगिरीबाबत पोलीस आयुक्तांनी त्यांना दहा हजारांचे बक्षीस दिले.