पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या वामन म्हेत्रेवर कठोर कायदेशीर कारवाई करापिंपरी चिंचवड मधील पत्रकारांचे तहसीलदारांना निवेदन
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी)- बदलापूर येथे काल झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी आज नायब तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली.
बदलापूर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारा संदर्भात जन आक्रोश निर्माण झाला होता यावेळी वृत्तांकन करत असलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी अर्वाच्य व अश्लील भाषा वापरली त्याच वेळी स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकारासंदर्भात पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी आज नायब तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. वामन म्हेत्रे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सदर निवेदन दिल्यानंतर पत्रकारांसमोर बोलताना ज्येष्ठ पत्रकार व पवना समाचार चे संपादक अरुण कांबळे म्हणाले की, शासन एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे व दुसरीकडे राज्यातील महिलांवरच अत्याचार व अन्याय होत आहे. पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या वामन मेहत्रे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून म्हेत्रे याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत तसेच विनयभंगाचेही गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष गोविंद वाकडे यांनी यावेळी बोलताना बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढे गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी केली.तर महिला पत्रकार भगिनीला अश्लील भाषेत बोलणाऱ्या आणि अपमानित करणाऱ्या वामन म्हेत्रे विरुद्ध कायदेशीर कारवाई करून शासनाने महिला पत्रकार देखील सरकारसाठी लाडक्या भगिनी आहेत दाखवून देण्याची जबाबदारी असल्याचं देखील वाकडे म्हणाले तर
पुढारी न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार
सचिन चपळगावकर यांनी यावेळी बोलताना मोहिनी जाधव यांच्या संदर्भात वामन मेत्रे यांनी केलेले वर्तन हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराइतकेच गंभीर स्वरूपाचे आहे त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. अशी मागणी करून यापुढे असे प्रकार घडल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी यावेळी बोलताना यापुढे असे घडल्यास अतिशय तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
दरम्यान आज करण्यात आलेल्या आंदोलनात PCB Today चे संपादक तथा जेष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश चिलेकर,टीव्ही 9 चे प्रतिनिधी रणजित जाधव, साम मराठी चे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे ,मुंबई तक चे प्रतिनिधी
कृष्णा पांचाळ, एनडी टीव्ही चे प्रतिनिधी सूरज कसबे ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन शिंदे, मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष पराग कुंकूलोळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, लीना माने, विशाल जाधव, राम बनसोडे,महादेव दिलीप देहाडे, संजय धुतडमल, देवा भालके, गणेश शिंदे, औदुंबर पाडळे, म्हासाळ आदी पत्रकार उपस्थित होते.