महिला पत्रकाराशी गैरवर्तन ‘रील स्टार’ संतोष पंडित याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा

0
2

दि.०१(पीसीबी)-सोशल मीडियावर स्वतःला ‘रील स्टार’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या संतोष पंडित याच्याविरोधात पुण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पत्रकाराशी गैरवर्तन, अश्लील टिप्पणी तसेच तिच्या परवानगीशिवाय मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.

ही घटना सोमवारी (३० मार्च) पुण्यातील टिळक रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.नाशिकमधील एका प्रकरणाच्या निषेधार्थ टिळक रस्त्यावरील महाविद्यालयाजवळ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. संबंधित महिला पत्रकार या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होत्या. याचवेळी संतोष पंडित तेथे आला आणि पत्रकारांवर संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत बोलू लागला. तक्रारीनुसार, त्याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली तसेच अपमानास्पद हावभाव करत तिच्याकडे पाहिले.

संबंधित पत्रकाराच्या इच्छेविरुद्ध मोबाईलद्वारे तिचे चित्रीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, आंदोलनात सहभागी इतर महिलांकडेही त्याने आक्रमकपणे धाव घेत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून संतोष पंडितविरुद्ध ( Santosh Pandit )भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संतोष पंडित( Santosh Pandit ) म्हणाला की, “एका महिला पत्रकाराने माझ्यावर गंभीर आरोप केले असून माझ्यावर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. संबंधित व्हिडिओ पाहून सत्य समजून घ्यावे. मी त्या महिला पत्रकाराला विनंती करतो की त्यांनी पुराव्यानिशी माझ्यावर गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. अन्यथा मी लवकरच या प्रकरणाबाबत सत्य समोर आणेन.”

या घटनेनंतर सोशल मीडियावर संतोष पंडितविरोधात संताप व्यक्त केला जात असून पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.