- एकदिवसीय महिला माध्यमकर्मी संमेलन संपन्न
पुणे, दि. १२ : महिलांना सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी विशेष करून महिला सक्षमीकरणामध्ये योगदान द्यावे. त्यांनी ग्रामीण आणि उपेक्षित महिलांचा आवाज बनावे, असे मत महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
आयएमडीआरच्या वीर सावरकर सभागृहात आयोजित व्हीएसके पुणे फाउंडेशन संचालित विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित ‘महिला माध्यमकर्मी संमेलन २०२५’च्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला माध्यमकर्मींनी आपल्या वार्तांकनातून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन रहाटकर यांनी केले.
त्या म्हणाल्या, “जसे आई प्रेम, लाड करते, प्रसंगी कठोर होऊन रागावतेही, अशा मातृत्व भावामधून महिलांनी पत्रकारिता करावी. स्वतःच्या क्षमता ओळखून महिलांनी पुढे यायला हवे. सक्षम असतानाही सादरीकरणाअभावी त्यांनl नेतृत्त्वाची संधी मिळत नाही. महिलांनी आता स्वतः ब्रॅंड बनत सर्वच क्षेत्रात नेतृत्त्व करावे.” यावेळी विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे, प्रशासकीय अधिकारी शिल्पा पोफळे उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी माध्यम, विचारसरणी आणि त्याचे काळानुरूप गणित समजावून सांगितले. ते म्हणाले, “माध्यम क्षेत्रात स्वतःची शैली विकसित करत स्वतःचे प्रेक्षक तयार करायला हवेत. माध्यमकर्मींनी ‘स्टोरी टेलर’ नाही, तर ‘स्टोरी चेंजर’ बनायला हवे. महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखत धारिष्ठ्य वाढविण्याचा प्रयत्न करायला हवे.”
यावेळी केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक डॉ. रवींद्र वंजारवाडकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह कार्यवाह महेश करपे, प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री आदि उपस्थित होते.
संमेलनात दुपारी ‘माध्यमातील मी’ या परिसंवादात प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक, आर. जे. शोनाली यांनी आपले अनुभव मांडले. संवाद सत्राचे समन्वय साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केले.
कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम क्षेत्रातील वापरावर प्रा. प्रांजली देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्राच्या संपादक अंजली तागडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील १०० हून अधिक महिला माध्यमकर्मी या संमेलनास उपस्थित होत्या.