महिला नेत्याचा धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप

0
225

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. शालिनीताई पाटील हे नाव महाराष्ट्राला माहित आहे. आता माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राजकीय आरोपांबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक मुद्दा आहे. शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्या 95 हजार कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात पत्र लिहिलय. अजित दादांना सरकारमध्ये घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा पचवला तसेच नरेंद्र मोदी यांनी 25 हजार कोटींचा घोटाळा देखील पचवला असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला.

“मी वारंवार याचा पाठपुरावा करत असताना देखील याकडे दुर्लक्ष केलं जातंय. मी उच्चस्तरीय वकील नेमून आता जोरदार लढाई लढणार आहे. भारतीय जनता पार्टीला भारतीय हे नाव वापरता येणार नाही, कारण तो त्यांचा अधिकार नाही, याविषयी देखील मी याचिका दाखल करून लढाई लढणार आहे त्यांचं जे जनसंघ नाव होत तेच त्यानी ठेवावं” असं शालिनीताई पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

“आता मी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेत्यांना आज पत्र लिहिले, लवकरच देशातील सर्व नेत्यांना लिहिणार. राज्याच्या मंत्रिमंडळात घोटाळे आणि आरोपी असलेले मंत्री आहेत. छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्याचा आरोप आहे तर धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक आरोप आहेत” असं त्यांनी पत्रात म्हटलय. शालिनीताई पाटील यांनी पत्रात धनंजय मुंडे यांच्यावर एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. “धनंजय मुंडे हे बाहेरून नर्तकी आणून 100 लोकांना जमवून घरात नर्तकीचे कार्यक्रम करतात” असा आरोप त्यांनी केलाय.