महिला नायब तहसीलदारांवर सख्ख्या भावानेच केला कोयत्याने वार

0
437

बीड, दि. ७ (पीसीबी) – : बीड जिल्ह्यातील केज येथील महसूल विभागाच्या महिला नायब तहसीलदारांवर सख्ख्या भावाने कौटुंबिक वादातून कोयत्याने मानेवर आणि डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केज तहसील कार्यालयातील आस्थापना विभागात हि घटना घडली आहे.

आशा वाघ असे महिला नायब तहसीलदाराचे नाव आहे. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मधुकर दयाराम वाघ (वय ४५, रा. दोनडिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मारहाण केलेल्या भावाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तहसील कार्यालयात मागील काही वर्षांपासून आशा वाघ या नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ यांच्यात परस्पर शेतीच्या कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. यानंतर सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास मधुकर याने केज तहसील कार्यालयात येऊन आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने आशा वाघ घाबरल्या आणि त्या जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात गेल्या. तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीसांनी मधुकर वाघ याला ताब्यात घेतले आहे.