फलटण येथील शासकीय रूग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली नसून ती हत्या किंवा खून आहे. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावामुळेच हा प्रकार घडला आहे, असा आरोप शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकर यांना ‘क्लीन चिट’ कसे देतात असा प्रश्न उपस्थित करत अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह महिला डॉक्टरला त्रास देणा-या आणि दबाव टाकणाऱ्या अन्य पोलीस अधिकारी आणि निंबाळकर यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व प्रकारात गौडबंगाल असल्याने उच्च न्यायालयाने त्यासाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रूग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणात भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, फलटण येथील रविवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांना क्लीन चिट दिली. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निंबाळकर यांच्यावर आरोप केले. शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यावेळी उपस्थित होते.
निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे फलटण येथील एका कुटुंबातील महिला सदस्यही यावेळी उपस्थित होत्या. त्यांनीही निंबाळकर यांच्यावर आरोप केले.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार निंबाळकर त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणत होते. कामगार कारखाना सोडून जावू नये यासाठी त्यांना मारहाण केली जात होते. फलटण पोलीस ठाण्यातील अधिका-यांच्या मदतीने कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात होते. सरकारी दवाखान्यात त्यांना दाखल करून कामगार फिजिकली फिट दाखविले जात होते. तसे करण्यासाठी या महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात होता. यासंदर्भात संबंधित महिला डॉक्टरने चार पानी पत्र वरिष्ठांना दिले होते. आत्महत्यावेळी तिने हातावर लिहिलेला मजकूरातील हस्ताक्षर तिचे नसल्याचा दावा डॉक्टरच्या कुटुंबाने केला आहे. फलटण येथे घर असतानाही ही महिला घटनेपूर्वी निंबाळकर यांच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवर गेली होती. ती का गेली याची चौकशी झाली पाहिजे. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे असे अंधारे यांनी सांगितले.
रणजितसिंह निंबाळकर भाजप मध्ये गेल्यानंतर सन २०२२ पासून पोलिसांना हाताशी धरून २७७ तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांना त्रास दिला. त्यासंदर्भात एफआयआर झाल्या आहेत. निंबाळकर फडणवीसांच्या जीवावर उड्या मारत आहेत. त्यातूनच त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.














































