महिलांवर अत्याचाऱ्या करणाऱ्या 151 आमदार, खासदारांचे करायचे काय ?

0
104

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – सध्या कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि महाराष्ट्रात बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचार, अकोल्यात शाळकरी मुलींचा विनयभंग यावरून देशातलं वातावरण तापलं आहे. अशातच असोसिएशन फॉर डेमॉक्रेटीक रिफॉर्म्स यांचा एक अहवाल समोर आला आहे.
यामध्ये किती खासदार, आमदार यांच्यावर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे, बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत? कोणत्या पक्षाचे किती आमदार, खासदार आहेत याची माहिती देण्यात आली आहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी मिळून 4809 पैकी 4693 विद्यमान खासदार, आमदारांनी निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला.
या प्रतिज्ञापत्रांतून आमदार, खासदारांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिलेली असते. यामध्ये 776 पैकी 755 विद्यमान खासदार, तर 4033 पैकी 3938 आमदार यांच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे. 2019 ते 2024 या काळात झालेल्या निवडणुकांमधल्या सगळ्या प्रतिज्ञापत्रांवरून त्यांनी ही माहिती गोळा केली असून यामध्ये पोटनिवडणुकांचासुद्धा समावेश आहे.
या अहवालामध्ये महिला अत्याचाराविरोधात कोणते गुन्हे खासदार, आमदारांवर दाखल आहेत त्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात अॅसिड हल्ला, बलात्कार, लैंगिक छळ, विनयभंग, महिलेचे कपडे उतरविण्याच्या उद्देशानं तिच्यावर हल्ला करणे, महिलेचा पाठलाग करणे, वेशाव्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी, विक्री करणे, नवरा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणारा छळ, पहिली पत्नी असताना तिच्या संमतीशिवाय दुसऱ्या महिलेसोबत लग्न करणे, हुंडाबळी अशा अनेक गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
755 विद्यमान खासदार आणि 3938 विद्यमान आमदारांपैकी 151 आमदार, खासदारांनी महिला अत्याचाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. यामध्ये विद्यमान 16 खासदारांचा समावेश असून 135 विद्यमान आमदार आहेत. यामध्ये बलात्कार, महिला अत्याचार, विनयभंग, वेशाव्यसायासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री, कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे सर्वाधिक भाजप लोकप्रतनिधींवर –
एकूण 151 लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाविरोधातील गुन्हे दाखल आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी आहेत याचीही माहिती देण्यात आली आहे. यात भाजपच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल असून त्यांची संख्या 54 आहे.
यानंतर काँग्रेसचे 23, तेलुगू देसम पक्षाचे 17, आम आदमी पक्षाचे 13, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या 10 आणि उर्वरीत इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहेत.
महाराष्ट्रातल्या स्थानिक पक्षांपैकी शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रत्येकी एका लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय.
पश्चिम बंगालच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराचे गुन्हे
या अहवालामध्ये राज्यानिहाय किती आमदार, खासदारांवर महिला अत्याचाराविरोधात गुन्हे दाखल आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात जिथं महिला डॉक्टरवर बलात्कार झाला त्याच पश्चिम बंगालमधील सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा समावेश असून ही संख्या 25 आहे. यात 21 आमदार, तर 4 खासदारांचा समावेश आहे. पश्चिम बंगाल पाठोपाठ आंध्र प्रदेशातल्या 21 आमदार, ओडिशाचे 16 आमदार तर 1 खासदार, दिल्लीचे 13 आमदार, महाराष्ट्राचे 12 आमदार, तर एक खासदार, बिहारचे 8 आमदार, तर एक खासदार, कर्नाटक 7 आमदार, राजस्थान 6 आमदार, मध्य प्रदेश 5 आमदार, केरळचे 3 आमदार, तर 2 खासदारांवर महिला अत्याचाविरोधातील गुन्हे दाखल झाले आहेत.