सोलापूर ,दि.०४ (पीसीबी)- शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. संभाजी भिडे यांनी बुधवारी (2 नोव्हेंबर) एका महिला पत्रकाराला उद्देशून एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विधानाचा अनेकांकडून निषेध व्यक्त केला जातोय. फक्त सोशल मीडिया नाही तर विविध माध्यमातून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर विविध स्तरावरुन टीका केली जातेय. या दरम्यान अमृता फडणवीस या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर अमृता यांनी या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
“संभाजी भिडे गुरुजींचा आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहेत. पण महिलांनी काय करावं, कसं जगावं, हे कोणी सांगू नये”, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंढरपुरात विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अमृता यांनी संभाजी भिडे यांच्या विधानावर भूमिका मांडली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्तेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी बुधवारी (2 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी एका महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाहीये .संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्य महिला आयोग देखील आक्रमक झाले आहे. राज्य महिला आयोगाकडून भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.