महिलांच्या सहभागातूनच द्वेषमुक्त निकोप समाजनिर्मिती – अभिनेते राहुल सोलापूरकर

0
86

– जातीद्वेष संपवून हिंदूंनी एकत्रित येण्याची गरज
– निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम

निगडी, दि. 23 (पीसीबी) : स्त्रीचा शब्द कुटुंबात परवलीचा शब्द असतो, ते एक अस्त्र असते त्याची ताकत ओळखून त्यांनी द्वेषमुक्त निकोप एकसंध समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जेष्ठ सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

निगडी येथील सावरकर मंडळ परिसरात झालेल्या भव्य मातृ शक्ती जागर कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई तारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.  पुढे बोलतांना सोलापूरकर यांनी मातृसत्ताक पद्धतीचा उल्लेख करत चापेकर बंधूंच्या मातोश्रींचे उल्लेख करून राष्ट्रहितासाठी असंख्य महिलांचे अतुलनीय योगदान आहे आता महिलांना त्यांचे न्याय हक्क त्वरित मिळवून देण्यासाठी भारतीय न्याय संहितेत देखील आमूलाग्र सुधारणा झाल्याचे सांगितले. वक्फ बोर्ड कायद्याचे त्यांनी सखोल विश्लेषण करून लव जिहाद, जमीन जिहाद, व्होट जिहाद या संबंधी महिलांनी जागृत राहणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असून जगभरातील सध्याची परिस्थिती बघता, लोकशाहीतील १००% मताधिकाराचा योग्य वापर करून आपण जातीपातीत न अडकता सर्वांनी एक हिंदू म्हणून हिंदूहिताची बाजू मांडणाऱ्या प्रतिनिधीच्या मागे आगामी विधानसभेला ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी बर्वे, परिचय शिल्पा बिबिकर तर आभार निवेदिता कच्छवा यांनी मानले.
यावेळी उत्साहात संपन्न झालेल्या दांडिया स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते झाले. सहभागी कलाकारांनी झळकवलेले भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, सणवार, १००% मतदान, महिला सशक्तीकरण या विषयावर संदेश देणारे आकर्षक फलक लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाला विविध संस्था संघटना, विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होत्या.