दि.११(पीसीबी)-पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर ७, सी सर्कल, इंद्रा डेअरी समोरील रस्त्यावर जिजाई प्रतिष्ठान आणि मा. नगरसेविका सीमाताई सावळे यांच्या वतीने महिलांसाठी विशेष दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि होतकरू महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देणे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल घडवून आणणे हा होता.
या बाजारात महिलांना विनामूल्य स्टॉल आणि आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. कपडे, दिवाळी सजावटीचे साहित्य, हस्तनिर्मित ज्वेलरी, विविध फूड स्टॉल्स, घरगुती मसाले, पारंपरिक दिवाळी फराळ यांसारख्या अनेक वस्तूंचे स्टॉल्स महिलांनी स्वतःच्या मेहनतीने उभारले होते.या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बाजारात येणाऱ्या ग्राहकांनीही या स्त्रियांच्या मेहनतीचं आणि कलात्मकतेचं भरभरून कौतुक केलं.
महिलांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की,”सीमाताई सावळे यांचं आमच्याविषयी असलेलं प्रेम, आपुलकी आणि सामाजिक जाण या प्रत्येक उपक्रमातून जाणवते. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आमच्यावर ठेवलेला विश्वास हेच खरे आमचे पाठबळ आहे.”या बाजारामुळे महिलांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, आणि स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव मिळाली. काही महिलांनी तर हेही सांगितले की,आमच्यासारख्या गरजवंत महिलांसाठीच ही खरी दिवाळी झाली आहे.
सीमाताई सावळे यांनी यावेळी सांगितले की, महिलांना आत्मनिर्भर बनवणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य यावं, त्यांची कला आणि मेहनत बाजारात पोहोचावी, म्हणूनच आम्ही हा उपक्रम दरवर्षी घेतो.”या दिवाळी बाजारातून केवळ विक्री नव्हे, तर महिलांच्या सशक्तीकरणाची आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची एक सकारात्मक उपक्रम केला गेला