महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या सख्या भावांना अटक

0
265

पुणे, दि. ७ (पीसीबी) – महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोघा सख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय राजू शेरावत (वय 23), अजय राजू शेरावत (वय 22, दोघे रा. हिंगणगाव, ता. हवेली) अशी चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. अनिल अंकुश नानावत (वय 39, रा. सणसवाडी, ता. शिरूर) असे चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजता बोऱ्हाडेवाडी मोशी येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास करत असताना चोरीचे दागिने विकण्यासाठी दोघेजण खडी मशीन रोडवर येणार असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सापळा लाऊन अक्षय आणि अजय यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरीचे दागिने अनिल नानावत याने खरेदी केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला देखील अटक केली.

आरोपींकडून 8 तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी असा एकूण चार लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तीन आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.