महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम स्टाईलने पसार होणाऱ्या तिघांना अटक

0
379

तळेगाव, दि. २८ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन आणि दिघी पोलीस ठाण्यातील एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

आकाश वजीर राठोड (रा. मुलखेड, लवळे फाटा, ता. मुळशी), विसाम राकेश नानावत (वय 20), विश्रांत राकेश नानावत (वय 22, दोघे रा. कंजारभट, अहिरवाडे रोड, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना घडली. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाचने केला.

दागिने हिसकावल्यानंतर चोरटे दुचाकीवरून धूम स्टाईलने पसार झाले. पोलिसांनी आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माग काढला. इंदोरी, देहूगाव, तळवडे, चिखली, मोशी, आळंदी या मार्गावरील सुमारे 75 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पोलीस अंमलदार ठाकरे आणि मालुसरे यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील दोघेजण जुना पुणे मुंबई महामार्गावर शेलारवाडी बस स्टॉप जवळ थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.

आरोपी चोरी केल्यानंतर ते दागिने विकण्यासाठी आळंदी येथे गेले असल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपींनी तळेगाव एमआयडीसी, देहूरोड आणि दिघी परिसरातून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी पाच गुन्ह्यातील 66.56 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 97 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीनही आरोपींना पुढील कारवाईसाठी तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार बनसोडे, ठाकरे, राठोड, मालुसरे, शेख, खेडकर, ईघारे, गाडेकर, भोसले, ब्रम्हांदे यांनी केली आहे.