महावितऱण स्वतंत्र कार्यालयाची गरज, आमदार अश्विनी जगताप यांची विधानसभेत मागणी

0
314

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराचे वेगाने होत असलेला विस्तार, शहरातील व्यापार, उद्योगांचे वाढते प्रमाण पाहता आता महावितरणचे स्वतंत्र कार्यालय निर्माण कऱण्याची गरज आहे, असे मत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

शासकीय विश्रामगृह, पोलिस मुख्यालय इमारत पाहिजे –
हिंजवडी, माण, मारुंजे, गहूजे, जांबे, नेरे आदी गावांच्या रस्त्यांसाठीही तो मागितला. तसेच पिंपरी चिंचवड शहरात विश्रामगृह बांधण्याकरता वाढीव निधीची मागणीही केली. तर, औचित्याच्या मुद्याव्दारे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला भेडसावणाऱ्या मुलभूत सोई सुविधांकडे सभागृहाचे आणि सरकारचेही लक्ष आज त्यांनी वेधले. पाच वर्षाच्या स्थापनेनंतरही पोलीस आयुक्तालय हे भाड्याच्या अपुऱ्या जागेत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

आयुक्तालय आणि मुख्यालयाच्या जागेचा गेल्या तीन वर्षापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शहरात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झालेला असल्याने आयुक्तालयाला सोयीसुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट २०१८ ला सुरु झालेले पिंपरीचे पोलीस आयुक्तालय हे पिंपरी महापालिकेच्या अपुऱ्या अशा शाळेच्या इमारतीत भाड्याच्या जागेत आहे. तर, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, लेखा शाखा आदी शाखांचे कामकाज शहरातील विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतलेल्या अपुऱ्या जागेमध्ये सुरु आहे. आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी, तर जागाच नाही.