महावितरणच्या थेरगाव, ताथवडे, वाकडच्या कार्यालयाचे विभाजन करा

0
322

– दिवाळीत वीज पुरवठा खंडीत होवू देवू नका

– खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला महावितरणच्या कामकाजाचा आढावा

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – वाढत्या नागरीकरणामुळे सांगवी, थेरगाव, वाकड, ताथवडे सब स्टेशनवर क्षमतेपेक्षा जास्त वीज कनेक्शन आहेत. ताथवडे विभागाकडे 80 हजार ग्राहक असून केवळ एक डीपी आहे. त्यामुळे डीपीवर अतिभार (लोड) येत असून विजेची समस्या उद्भवत आहे. त्यासाठी थेरगाव, ताथवडे आणि वाकड असे तीन भागात विभाजन करावे. त्या भागासाठी स्वतंत्र अधिका-यांची नियुक्ती करावी. जास्त क्षमतेचे विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात यावे, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. वेगाने नागरिकरण होत असलेल्या पुनावळे, रावेत, ताथवडे या भागात आत्ताच सब स्टेशन उभारावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील विद्युत वितरणासंदर्भातील विविध प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी आज (शनिवारी) महावितरणच्या अधिका-यांसोबत बैठक घेतली. गणेशखिंड सर्कलचे अधिक्षक अभियंता सतिश राजदीप, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चाकूरकर, भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, सांगवीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय बालगुडे, चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव, खराळवाडीचे भुजंग बाबर, निगडी, प्राधिकरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी बैठकीला उपस्थित होते. दिवाळीच्या कालावधीमध्ये वीज पुरवठा खंडीत होता कामा नये. शहर वाढत असून नागरिकरणात झपाट्याने वाढ होत आहे. त्यानुसार महावितरणने नियोजन करावे. जागोजागी डीपी बसविणे, केबल टाकण्याच्या कामाचाही आढावा खासदार बारणे यांनी घेतला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”वाढत्या नागरीकरणामुळे सांगवी, थेरगाव, वाकड सब स्टेशनवर क्षमतेपक्षा जास्त वीज कनेक्शन आहेत. एका सब स्टेशनवर 80 हजारांहून अधिक ग्राहकांचे कनेक्शन झाले आहेत. ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी झाली आहे. कर्मचारी कमी पडत आहेत. तक्रारींचे निराकरण वेळेत होत नाही. त्यामुळे या भागाचे विभाजन करावे. त्यासाठी वेगळे कार्यालय करावे. जेणेकरुन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होईल. कामे जलद गतीने होतील. डीपी उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांकडून महावितरणने जागा ताब्यात घेतल्या आहेत. परंतु, काही बांधकाम व्यावसायीक पुन्हा त्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, अशा जागा ताब्यात देवू नयेत”.

”थेरगाव भागातील वीज पुरवठा खंडीत होतो. त्यासाठी नवीन केबल टाकाव्यात. ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी. धोकादायक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर, डीपी बदलावेत. पिंपरी संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे फिडरवर आरएमयू बसविणे, एचटी केबल टाकावी. बॅक फिडसाठी एलटी केबल, फीडर पिलर बसविण्यात यावे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. निगडी, प्राधिकरणातही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. महावितरणने निधीसह काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी चर्चा करुन प्रस्ताव मंजुर करुन घेतले जातील. निधी मिळवून दिला जाईल. ही रखडलेली कामे मार्गी लागल्यावर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल”, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

कामे जलदगतीने करावीत

”शहरातील ज्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. कमी क्षमतेचे डीपी आहेत. डीपीची दुरावस्था झाली आहे. त्या भागातील जुने डीपी बदलून नवे डीपी बसवावेत. स्मार्ट सिटी अंतर्गत कामांसाठी ठेकेदारांनी रस्ते खोदल्यामुळे केबल तुटल्या आहेत. त्या केबल ठेकेदाराने बदलून देणे अपेक्षित होते. परंतु, महावितरणने सूचना देवूनही स्मार्ट सिटीकडून केबल बदलून दिल्या नाहीत. अशा विविध कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होतो. पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, रहाटणी या भागात केबल तुटल्या आहेत. त्यावर तोडगा काढावा. महावितरणने हाती घेतलेली, भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेली पुढची कामे जलदगतीने पूर्ण करावीत”, अशा सूचनाही खासदार बारणे यांनी केल्या.

नागरिकांचे फोन टाळू नका

”थेरगाव, काळेवाडी, रहाटणी या दाट लोकवस्तीच्या भागातून वीज पुरवठ्याबाबत येणा-या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु, महावितरणकडून या तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. तक्रार निवारण केंद्रात फोन उचलून बाजूला ठेवला जातो. नागरिकांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. हे अयोग्य आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढतो. तक्रारींचे प्रमाण जास्त असेल. परंतु, नागरिकांशी बोलले पाहिजे. तक्रारीचे गांभीर्य समजून घेणे कर्मचारी, अधिका-यांचे कर्तव्य आहे. नागरिकांसोबतचा संवाद तोडू नका, नागरिकांना टाळू नका, वस्तुस्थिती समजावून सांगावी. त्यामुळे नागरिकांचा रोष कमी होईल”, असेही खासदार बारणे म्हणाले.