महावितरणचे खाजगीकरण करण्यासाठी ‘खोके’ सरकार पुढाकार घेत आहे-चेतन बेंद्रे

0
306

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – देशातील विमानतळ,कोळसा खाणी,रेल्वे सह सरकारी उद्योग अदानी,अंबानी कार्पोरेटच्या ताब्यात देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचे कारस्थान केंद्र सरकार करत आहे, असा आरोप आप चे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन ब्रेंन्दे यांनी केला आहे.

आपल्या प्रसिध्दीपत्रात बेंन्द्रे म्हणतात, महाराष्ट्रातील वीज वितरण,निर्मिती क्षेत्र अदानी समूहाकडे हस्तांतरीत करण्याचे गुप्त कारस्थान शिंदे फडणवीस सरकारचे आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यात आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला. संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि ऊर्जा मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तासाची बैठक झाली. बैठकीनंतर सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेतली.

संप महावितरणाच्या खासगीकरणाच्या विरोधात आणि ज्या अदानी ग्रुप कंपनीमुळे सुरू झाला त्या कंपनीचे नाव घेण्याची हिंमत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची झाली नाही. महावितरणाच्या तीन कंपन्यांमध्ये पुढील तीन वर्षांकरिता वेगवेगळ्या माध्यमांतून 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. तिन्ही कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

50 आमदारांना प्रत्येकी 50 खोके (म्हणजे अडीच हजार कोटी) मध्ये विकत घेऊन सत्तेत आलेले हे भाजपा सरकार महावितरणचे खासगीकरण थांबविण्यासाठी फक्त पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. अशाच अनेक पोकळ घोषणांसारखी ही घोषणा सुद्धा पोकळ आणि फसवी असेल यात आम्हाला तिळ मात्र शंका नाही. महावितरणचा कोट्यवधी रुपयांचा महसूल,पायाभूत सुविधा,अब्जावधी किमतीची साधन सामुग्री अल्प दरात कार्पोरेटच्या घशात जात आहे आणि महावितरणच्या लाखो कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारमय होणार आहे.असा इशारा चेतन बेंद्रे यांनी दिला आहे.