महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती

0
181

पुणे, दि. २० (पीसीबी) : प्रामुख्याने उद्योगांसह घरगुती, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने चाकण उपविभागाचे विभाजन केले आहे. नव्या रचनेत चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासूली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण ३६ तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आले असून येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे कार्यालय सुरु होतील.

महावितरणच्या राजगुरुनगर विभागामध्ये सध्या चाकण, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि राजगुरुनगर असे पाच उपविभाग आहेत. यात चाकण उपविभाग अंतर्गत एकूण पाच शाखा कार्यालय आहेत. चाकण उपविभागातील १ लाख १३ हजार ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे ७ हजार ८०० उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत. महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील प्रामुख्याने किंग्फा व ह्युंदाई २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन गेल्या डिसेंबरमध्ये एकाचवेळी कार्यान्वित करण्यात आले आहे.

सुरळीत वीजपुरवठ्यासोबतच तत्पर ग्राहकसेवेसाठी चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग व दोन शाखा कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव महावितरणच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजूर केला आणि त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

आता चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग तयार करण्यात आला आहे. नव्या रचनेत पूर्वीच्या चाकण उपविभागात (कंसात ग्राहकसंख्या) चाकण शहर (२७,६५४), भोसे (१०,७४६), आळंदी शहर (२३,७५९) आणि आळंदी ग्रामीण (८,३१५) ही चार शाखा कार्यालय व एकूण ७० हजार ५७४ ग्राहकसंख्या असेल. तर नव्या चाकण एमआयडीसी उपविभागात चाकण ग्रामीण (१९,१६३), वासूली (८,२०६), निघोजे (१४,९३४) हे तीन शाखा कार्यालय व एकूण ४२ हजार ३०३ ग्राहक असतील.

चाकण एमआयडीसी उपविभाग कार्यालयासाठी उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या वासूली व निघोजे शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ असे प्रत्येकी १२ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – ‘चाकण उपविभागात उद्योग व इतर सर्व ग्राहकांसाठी पायाभूत वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाचे कामे वेगात सुरु आहेत. या सोबतच तत्पर व दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी आता नवीन उपविभागाची निर्मिती झाली आहे. मनूष्यबळ वाढले आहे. त्यामुळे एमआयडीसीसह चाकण शहर व ग्रामीण परिसरातील सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार ग्राहकसेवा मिळणार आहे’.