महावितरणकडून ‘एसएमएस’ सेवा; मात्र अद्यापही ६ लाखांवर ग्राहक स्वतःहूनच वंचित

0
327

पश्चिम महाराष्ट्रात ९३ टक्के मोबाईल क्रमांकाची नोंदणी

पुणे, दि. १२ (पीसीबी) – महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा एकूण ८५ लाख ५६ हजार ५३१ पैकी ७९ लाख २९ हजार ७४८ (९२.६७ टक्के) वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमाकांची नोंदणी केलेली आहे. या सर्व ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. मात्र अद्यापही ६ लाख २६ हजार ७८३ वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसल्याने ते या सेवेपासून स्वतःहूनच वंचित आहेत.

महावितरणकडून वीजग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, वीजपुवरठा खंडित करण्याची नोटीस मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.

तथापि पश्चिम महाराष्ट्रातील अद्यापही अकृषक ४ लाख ९६ हजार ५०१ तर कृषी १ लाख ३० हजार २८२ अशा ६ लाख २६ हजार ७८३ वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे ‘एसएमएस’द्वारे मिळणाऱ्या माहितीपासून ते वंचित आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ४३९ ग्राहक, सोलापूर- १ लाख ९ हजार ३६६, सांगली- ८३ हजार ६६२, कोल्हापूर- ५९ हजार ६०७ आणि सातारा जिल्ह्यातील ५२ हजार ९८२ वीजग्राहकांचा समावेश आहे. या सर्व वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी व ‘एसएमएस’ सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे. जे वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत त्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ७९ लाख २९ हजार ७४८ वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली असून त्यांना महावितरणकडून नियमितपणे ग्राहकसेवेचे ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहेत. यामध्ये पुणे जिल्हा- ३९ लाख ४ हजार ४४६ (९२.४ टक्के), सातारा- ९ लाख ८२ हजार २८९ (९४.९ टक्के), सोलापूर- १० लाख १८ हजार ३७७ (९०.३ टक्के), कोल्हापूर- ११ लाख ५८ हजार ८७९ (९५.१ टक्के) आणि सांगली जिल्ह्यातील ८ लाख ६५ हजार ७५७ (९१.२ टक्के) ग्राहकांचा समावेश आहे.

अशी करा मोबाईल क्रमाकांची नोंदणी- ज्या ग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांना महावितरणच्या ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.