महाविकास आघाडी लागली महापालिकेच्या तयारीला – गुरुवारी काळेवाडीत आभार मेळावा

0
468

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकालात पराभव झाला तरी लाखभर मते मिळाल्याने आगामी काळात मोठे महाविकास आघाडीला मोठे यश मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीच्या घटकपक्षांचा मिळून आभार मेळावा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता काळेवाडी येथील संतोष मंगल कार्यालयात आयोजित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक आमदार सुनिल शेळके यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, उमेदवार नाना काटे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह सर्व घटकपक्षांचे शहरातील प्रमुख नेते, विविध सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात महापालिका निवडणुकिच्या दृष्टीने तयारीचे नियोजन यावेळी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शहरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी भेटले. त्यावेळी आता पुढच्या तयारीला लागा, असा संदेश पवार यांनी दिल्याने अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ आभार मेळाव्याचे आयोजन केले.

भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना मिळालेल्या मतांपेक्षा काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांना मिळालेली मते अधिक असल्याने राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेस आतापासून तयारीला लागले आहेत. काटे यांना एक लाख मते मिळाली म्हणून कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा आभार मेळावा आहे. भाजपच्या विरोधात वज्रमुठ करून यावेळी महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायचीच असा निर्धार यावेळी कऱण्यात येणार आहे.