मुंबई, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता फक्त 24 तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वांची उत्सुकता ही निकालाकडे लागली आहे. 20 नोव्हेंबररोजी मतदान पार पडल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले. काही पोल्समध्ये महाविकास आघाडी तर काही पोल्समध्ये महायुतीला यश मिळणार, असे अंदाज बांधण्यात आले. अशात आणखी एक प्रसिद्ध एक्झिट पोल समोर आलाय. यात महाविकास आघाडीच्या बाजूने विजयाचा कल असल्याचे म्हटले आहे.
या एक्झिट पोलनुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळणार, असा अंदाज आहे. तर, महायुतीला फक्त 127 जागांवर समाधान मानावे लागू शकते. महाराष्ट्रातील विधानसभेसाठी बहुमताचा आकडा हा 149 आहे. हा आकडा महाविकास आघाडी गाठू शकते, असा अंदाज आहे.
महाविकास आघाडीला मिळणार बहुमत?
यामध्ये सर्वाधिक जागा या मराठवाड्यात येतील, असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीला 149 जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्यात मराठवाड्यातील 30, मुंबईत 18, उत्तर महाराष्ट्रात 23, ठाणे आणि कोकणात 17, विदर्भात 31 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 30 जागांचा समावेश आहे.
दुसरीकडे, महायुतीला राज्यातील 288 पैकी 127 विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल असा अंदाज आहे. असं झाल्यास भाजप अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यास प्रयत्न करू शकते, असं म्हटलं जातंय. महायुतीमधील शिंदे गटाच्या नेत्याने देखील यावर भाष्य केलंय. गरज पडल्यास अपक्षला सोबत घेऊन सरकार स्थापन करू, असा दावा बड्या नेत्याने केलाय.
महायुतीला कोणत्या जागेवर यश मिळणार?
मराठवाड्यात 15 जागा
मुंबईत 18 जागा
उत्तर महाराष्ट्र 21
ठाणे-कोकण 18
विदर्भ 29 जागा
पश्चिम महाराष्ट्र 26 जागा
दरम्यान, यावर्षी राज्यात तब्बल सरासरी 66.05 टक्के मतदान झाले.राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरात, तर मुंबईत सर्वात कमी 52.07 टक्के मतदान झालं आहे. आता उद्या 23 नोव्हेंबररोजी निकाल जाहीर होणार आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोल्समध्ये जरी काही अंदाज बांधण्यात आले असले तरी निवडणुकीचे खरे चित्र हे उद्याच स्पष्ट होईल.