महाविकास आघाडीत फूट पडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत

0
191

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावतीत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं होत. महाराष्ट्रात आज आघाडी आहे, पण उद्या काय होईल हे सांगता येत नाही, असे शरद पवार म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले, शरद पवार जे बोलतात त्यात गांभीर्य असते.

शरद पवार यांनी रविवारी (२३ एप्रिल) अमरावती येथे पत्रकार परिषदेत अनेक विषयावर भाष्य केले. त्यांनी भाजपला देखील इशारा दिला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “शरद पवार साहेब खूप अनुभवी नेते आहेत. त्यांची विधाने महत्त्वाची असतात. ते जे बोलतात त्यात गांभीर्य असते. ज्याला जे वाटेल त्याने तो विचार करावा, मी एवढेच सांगेन” शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारे वक्तव्य केले होते. पवार म्हणाले, “आज महाराष्ट्रात आघाडी आहे. एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे, पण इच्छा असून काय होते. पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत. आघाडी कायम राहणार की नाही यावर चर्चा झाली नाही. अनेक प्रक्रिया आहेत. जागावाटपाचा मुद्दा आहे.”

शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आघाडीत सर्व आलबेल असल्याचे सांगितले. राऊत म्हणाले, महाविकास आघाडी राहणार आहे. २०२४ च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल. यामध्ये शरद पवार यांची प्रमुख भूमिका असते.