महाविकास आघाडीत गळती सुरू, अबू आझमींचा मविआला निरोप

0
52

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा धक्का बसल्यापासूनच महाविकास आघाडीत फूट पडण्याची चर्चा होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआला झटका बसला आहे. कारण समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमचा निषेध नोंदवत आमदारकीची शपथ न घेण्याचा पवित्रा घेतला असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मात्र हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अबू आझमींनी मविआचा निरोप घेतला. पराभवानंतर शिवसेनेने पुन्हा आपली विचारधारा बदलली. उद्धव ठाकरे म्हणाले की माझा हिंदुत्वाचा मुद्दा कायम राहील. सर्व धर्मांना सोबत घेऊन चालू, असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करण्यास सांगितलं, यावरुन अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली.

६ डिसेंबर हा बाबरी उद्ध्वस्त झाल्याचा दिवस. सुप्रीम कोर्टाने कोणालाही शिक्षा दिलेली नाही. आम्ही विसरलो, पण आमच्या जखमा वारंवार उघड केल्या जात आहेत. अशा व्यक्तींसोबत मी कधी राहू शकत नाही. आता शरद पवार आणि काँग्रेसलाही विचार करायचा आहे. मी अखिलेश यादव यांच्याशी बोलेन, की महाराष्ट्रात तरी आम्ही सोबत राहू शकत नाही, असं अबू आझमींनी स्पष्ट केलं.

नवाब मलिक हरले त्यांच्याशी काय बोलायचं, अबू आझमी अजित पवारांना का भेटले?
दहा दिवसांपूर्वीच अबू आझमी हे ‘देवगिरी’ या शासकीय बंगल्यावर अजित दादांच्या भेटीला गेले होते. तेव्हाच राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केलेल्या आरोपांविषयी चर्चा करण्यासाठी गेल्याचा दावा आझमींनी भेटीनंतर केला होता.

विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. भिवंडी पूर्व येथून रईस शेख, तर अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नवाब मलिक यांना पराभवाचा धक्का दिला. आता ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले रईस शेख काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.