महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, एक्झिट पोलचा लोड घेऊ नका – शरद पवार

0
49

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडल्यानंतर राज्यामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला झटका देणार आणि कोणाला सत्तेत आणणार? याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सातत्याने विजयाचा दावा केला जात आहे. एक्झिट पोलमध्ये सुद्धा राज्यातील सत्तासमीकरणांवरून संभ्रमावस्था असल्याने नेमकी कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. या बैठकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

ऑनलाईन झालेल्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत मीडियामध्ये सादर करण्यात आलेल्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. दरम्यान, शरद पवार यांनी मतमोजणी संदर्भात सुद्धा दिला. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका, जिंकल्यानंतर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबईला येण्याच्या सूचना सुद्धा शरद पवार यांनी या ऑनलाइन बैठकीमध्ये आपल्या उमेदवारांना केल्या आहेत. मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागात येणाऱ्या आमदारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाकडून हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उमेदवारांसंदर्भात शरद पवार यांनी बैठक घेतल्यानंतर काँग्रेसकडूनही आज दुपारी ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये प्रश्न काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार असून बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन झूम मीटिंगची लिंक सुद्धा त्यांना पाठवण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.

दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांना उद्याच्या रणनीती संदर्भात ऑनलाईन बैठक घेत मार्गदर्शन केलं आहे. महाविकास आघाडीकडून एक्झिट पोल बाजूला सारत सरकार स्थापन करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. यासंदर्भाने जे अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे त्यांना पुन्हा फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे. समविचारी पक्षांना सुद्धा संपर्क साधण्यात आला आहे. दरम्यान, प्रहारचे बच्चू कडू यांनी सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सोबत येण्यासाठी फोन आल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपली दिशा स्पष्ट केली आहे. आम्ही सत्तेत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.