महाविकास आघाडीच्या शक्तिशाली एकजुटीचे पुण्यात पाहिलेले दर्शन

0
207

राहुल गांधींच्या विनंतीचा मान बाळासाहेब धाबेकर यांनी राखला तिथेच धंगेकर निवडून आले….

पुणे, दि . ०२ (पीसीबी) – ‘कुठल्याही परिस्थितीत धंगेकरांना निवडून आणायचंच’ असा निश्चय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे बाळासाहेब धाबेकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. अखेर राहुल गांधी यांनी फोन केल्यानंतर धाबेकरांनी माघार घेतली आणि महाविकास आघाडीचा जीव भांडयात पडला.याच दिवशी खरं तर रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित झाला होता.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत मागील वीस दिवस अतिशय जवळून अनुभवण्याची (दिवसातील १८ तास) संधी मला मिळाली होती. धंगेकर यांच्या निवडणूक ‘मिडिया टिममध्ये जबाबदारी पार पाडत असताना पुणेकर सुज्ञ नागरीक ( विशेषतः सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ ) पुण्यातील पत्रकार, पुण्यातील व्यापारी (रविवार पेठ ,भवानी पेठ, नाना पेठ) पुण्यातील सर्वसामान्य गोर-गरीब नागरिक (गंज पेठ, घोरपडे पेठ, दत्तवाडी )आणि बुधवार पेठ मधील मतदार असलेल्या वेश्या , कुंटणखाना मालकिणी अशा सर्व स्तरातील लोकांच्या देहबोलीचा व धंगेकरांबद्दल असलेल्या आत्मियतेचा परिचय या निमित्ताने मला खुप जवळून झाला.

सलग पाच वेळा नगरसेवक (२५ वर्ष) म्हणून निवडून येत असलेले धंगेकर कसबा विधानसभा क्षेत्रात इतके का लोकप्रिय आहेत? का जनता त्यांच्यावर जीव ओवाळून टाकते ? या माणसाचं सतत निवडून येण्याचं रहस्य काय? याचा ‘आॅंखो देखा हाल’ मला या निमित्ताने टिपता आला. महाविकास आघाडीचा एकत्रित चाॅईस ठरलेले रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली तिथंच सर्वप्रथम भाजपाच्या पायाखालची जमीन हादरली. कारण बाई, बाटली, रगेल, रंगेल, पैशाचा माज, श्रीमंतीचा दर्प अशा कुठल्याच श्रेणीत न बसणारा आणि न अडकवता येणारा हा उमेदवार होता. पंचवीस वर्षापासून २४ तास स्कूटरवरून फिरणारा हा ‘धंगेकर बाबा’ आपल्याला जड जाणार? याची भाजपला सुरुवातीपासूनच अगदी पहिल्या दिवसापासून धास्ती होती. परंतु वातावरण फिरवायचं ,परिस्थिती बदलायची, व निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करायचं व विजय प्राप्त करायचा या अलीकडच्या पॅटर्नवर भाजप मंडळींचा प्रचंड विश्वास व श्रद्धा….!

कसब्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब धाबेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताच महाविकास आघाडीला हा मोठा अडथळा ठरणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव सेनेतील सर्वांचे धाबे दणाणले. धाबेकरांनी ५-१० हजार मते जरी घेतली तरी आपली सीट धोक्यात येत असल्याचे पाहून थेट राहुल गांधींना विनंती करण्यात आली की ‘आपण बाळासाहेब धाबेकरांना फोन करावा’. राहुल गांधींनीही त्वरित फोन लावला. साक्षात काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याचा फोन आल्यानंतर अखेर अर्ज माघारी घेत बाळासाहेब धाबेकरांनी “धंगेकरांचा आता श्वास बनून राहील” असे वचन राहुलजींना दिले. दुरंगी लढत आता फिक्स झाली. तरीही भाजपच्या पुण्यातील एका माजी खासदाराने व एका कॅबिनेट मंत्र्यांनी दोन दिवसानंतर बाळासाहेब धाबेकर यांचे घर गाठलंच..( आता हे दोघं काय बोलले असतील याचा अंदाज आपण लावू शकता) पण बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाशी निष्ठा त्यांनी कायम ठेवली.

‘कसब्यात भाजप नकोच’ या उद्देशाने मग अख्खं आयुष्य राजकारणात व पुण्यात घालवलेले अंकुश काकडे, रमेश बागवे, मोहन जोशी, उल्हास पवार, उल्हास काळोखे, दीप्ती चौधरी, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर अरविंद शिंदे ,आबा बागुल, रवींद्र माळवदकर या जुन्या टीम बरोबरच नव्या दमाच्या प्रशांत जगताप, संजय मोरे, गजानन थरकूडे, रूपाली ठोंबरे, विशाल धनवडे या शिलेदारांची एकत्रित दमदार साथ धंगेकरांना लाभली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांच्या स्थानिक जेष्ठ कार्यकर्त्यांचं बॉण्डिंग इतके जुळलेलं होतं की, मनभेद- मतभेद, मान- अपमान, जेष्ठ- श्रेष्ठ असे इगो औषधालाही पाहायला मिळालं नाही. मी काँग्रेस भवनला का जावू? किंवा मी नव्या पुलावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला का जावे? असे प्रकार घडले नाही. घरी चहा- नाश्ता न‌ करता दोन्ही काँग्रेसवाले सेनेच्या शाखेत जमा होत तेथे भजी- इडली मागवत चर्चा व्हायच्या, नियोजन ठरायचं. निरीक्षक असलेले भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी तर जिवाचं रान करत तब्बल वीस दिवस शहराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही.

शेवटच्या टप्प्यात अजितदादा पवार, नाना पटोले, सुनील केदार यांनी तर पुण्यात ठोकलेला तळ यामुळे ऊर्जा निर्माण होत वातावरणाचा टेम्पो कायम राहिला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तीन बैठका, एक सभा,सुषमा अंधारे यांच्या दोन सभा,अशोक चव्हाण-अमित देशमुख,- विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात यांच्या सभा तर आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा “न भूतो न भविष्यती “प्रतिसादाची ठरली. संघभावना, एकजूट व स्वच्छ चारित्र्य, जमिनीवर असलेला उमेदवार यामुळे महाविकास आघाडीला हे यश गाठता आलं आहे.

भाजपच्या उमेदवाराचं सलग तीन वर्ष स्थायी समिती अध्यक्ष असणं, कार्पोरेट स्टाईल राहणीमान या तुलनात्मक बाबी नक्कीच ठरल्या. आजारी बापटांना प्रचारात उतरविणं, टिळक घरातील उमेदवार नसणं या गोष्टी मतदारांना पटल्या नाही. कट्टर भाजपचे व जीव गेला तरी भाजपची साथ न सोडणारे बहुसंख्य व्यापारी, दुकानदार धंगेकरांनी करोना काळात केलेली मदत व उपकार विसरूच शकत नव्हते. “पैशाची काळजी करू नको,एफडी मोडतो परंतू रवी तू आमदार हो” असे माझ्यासमोर अनेक सोन्या चांदीचे व्यापारी धंगेकरांना खुलेआम सांगायचे.धंगेकर हे जनतेतील,जनतेला भावणारे उमेदवार ठरले. सहज संवाद करता येईल,कान‌ पिळता येईल..इतकी नैसर्गिकता व आपला नगरसेवक म्हणून लोकप्रियता मी धंगेकर व कसब्यातील जनतेमध्ये प्रथमच पाहिली.
एकूणच महाविकास आघाडीची अशीच एकजूट व संघभावना कायम राहिली तर २०२४ मध्ये भाजप सत्तेवरून जाऊ शकते याची चुणूक व झलक कसब्यातून अनुभवयास मिळाली