महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची तारिख ठरली

0
8

अकोले, दि. २६ (पीसीबी) : महाविकास आघाडीच्या जागावाटपावर जयंत पाटील म्हणाले की, एक तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्हाला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे आज उमेदवाराची घोषणा करणार नाही आणि भाषण सुरू असताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते, असे म्हणत अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी टोला लगावला. तर अमित भांगरे यांचे नाव न घेता एक प्रकारे जयंत पाटील यांनी उमेदवारीच जाहीर केली.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. आज ही यात्रा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथे धडकली. या यात्रेच्या जाहीर सभेतून बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मविआच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार? याबाबत थेट तारीखच सांगितली.

तुतारी हाती घेण्यासाठी राज्यात लोकांची मोठी स्पर्धा
अमित शहा म्हणतात की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांना रोखा. या दोघांमुळे आपल सरकार जातंय हेच त्यांनी आता मान्य केलं आहे. भाजपचा एक नेता मला म्हणाला की लोक म्हणतात तूतारी हाती घ्या. सगळीकडे तुतारीची हवा आहे. म्हणून तुतारी हाती घेण्यासाठी राज्यात लोकांची मोठी स्पर्धा सुरू आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

सरकार केवळ पैशांची उधळपट्टी करतंय
ते पुढे म्हणाले की, हे सरकार थकबाकीत गेलं आहे. सरकारने अनेक जीआर काढले मात्र काम होतील की नाही ही शंका आहे. आदिवासींच्या खात्यातून पैसे काढून या योजना सध्या हे सरकार चालवत आहे. हे सरकार केवळ पैशांची उधळपट्टी करत आहे. केवळ ठेकेदारांसाठी या योजना केल्या जात आहे, असा निशाणा जयंत पाटील यांनी यावेळी महायुती सरकारवर साधला.
जयंत पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी तुमचा उत्साह गरजेचा आहे. काल मोठा पाऊस सुरू झाला आणि इथे चिखल झाला होता. मात्र अमित भांगरे व युवकांनी पूर्ण काम केलं व आज सभा होत आहे. महाराष्ट्रातील 31 खासदार दिल्लीला आपण पाठवले. भाजपाला लक्षात आलंय आता त्यांचं सरकार येणार नाही. त्यामुळे तिजोरीचे दार उघडून पाहिजेत अशा घोषणा केल्या जात आहेत. सव्वा लाख कोटींचं कर्ज आम्हाला द्या, अशी मागणी सरकार आरबीआयकडे करत आहे. त्यांची लाडकी खुर्ची सोडेपर्यंत राज्यावर सव्वा 9 लाख कोटींचे कर्ज हे सरकार करणार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.