महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा

0
76

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू आहेत. महायुतीत तर या पदावरून रस्सीखेच सूरू आहे. प्रत्येक घटक पक्ष त्याच्या नेत्याचा गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ अडकवून मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी दोनदा हा विषय मांडला. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती केली. पण इतर दोन पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? त्याची निवड कशी होईल, यावर मोठे भाष्य केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही अगोदरच 32 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता. महाविकास आघाडीने 31 जागा जिंकून हा दावा खरा करून दाखवला. आता विधानसभेला पण महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने जुन्या चुका टाळल्या. इंडिया आघाडीची स्थापना हे त्याचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिले. जो पक्ष सर्वात मोठा असतो, त्याचा मुख्यमंत्री होतो, ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे ते म्हणाले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना याच फॉर्म्युला आधारे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तेव्हा शिवसेना हा मोठा पक्ष होता. येथे विरोधक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचा निर्णय काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी घेतील असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील मतभेदावर त्यांनी मन मोकळं केलं. ते म्हणाले की तीनही पक्ष एकच अजेंडा, एकच रणनीतीवर काम करतील. त्याआधारे निवडणुकीच्या मैदानात उतरली. महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी त्यांनी बाजू मांडली. मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत विविध प्रदेशातील मुद्दे समोर करत त्यांनी काँग्रेसचा स्ट्राईक रेट कसा वाढला याची माहिती दिली.