पिंपरी, दि. १९(पीसीबी) “महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. उत्तुंग कर्तृत्व अन् देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा महापुरुषांचे स्मरण करणे अत्यावश्यक कर्तव्य ठरते!” असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे मंगळवार, दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या १२५व्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचा जाहीर सन्मान करण्यात आला; त्याप्रसंगी शंकर गायकर बोलत होते. आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड संघचालक विनोद बन्सल, हेमंत हरहरे, मिलिंद देशपांडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, सहकार्यवाह रवींद्र नामदे, डॉ. नीता मोहिते, संजय कुलकर्णी, अशोक पारखी, नितीन बारणे, गतिराम भोईर, शाहीर आसराम कसबे, कांता जाधव आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
“चापेकर कुटुंबीयांचा त्याग किती असीम होता त्याची कल्पनाही आता करता येत नाही. सर्वांना आवर्जून पाहावेसे वाटेल अशा भव्य स्वरूपात चापेकर स्मारकाची उभारणी व्हावी!” अशी अपेक्षा अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना विक्रमसिंह मोहिते यांनी, “छत्रपती शिवाजीमहाराज हे बाविसाव्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या शिवराम हरी राजगुरू यांचे आदर्श होते. व्यक्तिगत कारणांसाठी आपापसात वैरभाव जोपासण्यापेक्षा संस्कृती, भाषा, परंपरा यांच्या विरोधात कार्यरत असलेल्यांना शत्रू समजले पाहिजे!” अशा भावना व्यक्त केल्या.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी केलेल्या शांतिमंत्राच्या सामुदायिक पठणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून अखंड भारतातील ब्रिटिशविरोधी आंदोलनांचा आणि सर्व सामाजिक चळवळींचा इतिहास एका भव्य संग्रहालयात जतन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
आपल्या अभिनिवेशपूर्ण शैलीतून शंकर गायकर पुढे म्हणाले की, “आपल्या गर्भातील बाळावर देशभक्तीचा संस्कार करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांचे स्वराज्याप्रति अमूल्य योगदान आहे. संभाजीराजे यांच्यापासून हिंदुस्थानातील तमाम क्रांतिकारकांचे स्मरण करणे हे उचित कर्म आहे. त्यामुळे हा केवळ स्मृतिदिन नाही; तर शौर्यदिन आहे. शाहिस्तेखानाला दिलेला धडा आणि ‘गोंद्या आला रे!’ अशा इतिहासातील अनेक ऊर्जादायी प्रसंगांचे कायम स्मरण केले पाहिजे. गुरू गोविंदसिंगांपासून ते विनायक दामोदर सावरकरांपर्यंत असंख्य क्रांतिवीरांनी देशाच्या मातीसाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे संपूर्ण खानदान एकत्रित केले तरी कोणी सावरकर होऊ शकत नाही. काळाच्या जबड्यात हात घालून क्रांतिकारकांनी या देशाचा इतिहास निर्माण केला आहे. तो इतिहास आम्हाला सहजपणे विसरता येणार नाही. विविध पंथ असलेतरी आम्ही सर्व हिंदू एक आहोत!”
सत्कार सोहळ्यानंतर योगेश सोमण निर्मित ‘द प्लॅन’ या ब्रिटिश अधिकारी रॅण्ड आणि जॅक्सन यांच्या वधाचा इतिहास चित्रीत करणाऱ्या दीर्घांकाचे सादरीकरण करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश अगज्ञान यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.