नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात आला पाहिजे. तसेच नव्या संसदेच्या इमारतीतही बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्रं लावलं पाहिजे, अशी मागणी सर्व खासदारांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या गटाच्या सर्व खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात उभारण्याची मागणी केली. हे निवेदन पंतप्रधानांना देणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आमचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि इतर खासदारांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा बसवण्याची मागणी केली आहे. नव्या संसदेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचीही मागणी केली आहे. मला निवेदन दिलं. मी याबाबत पंतप्रधानांकडे मागणी करणार आहे. पंतप्रधान याबाबत सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जुनं महाराष्ट्र सदन यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी
राज्यातून यूपीएससीच्या परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थी दिल्लीत येत असतात. या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा नसते. त्यामुळे त्यांची गैरसोय होत असते. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी आज काही निर्देश दिले. यूपीएससीच्या मुलांची राहण्याची गैरव्यवस्था होते. त्यामुळे जुन्या महाराष्ट्र सदनात 150 मुलांची राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या आरक्षित भुखंडावर 500 ते 600 मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील यूपीएच्या विद्यार्थांची राहण्याची सोय होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.