महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनी “एमआयटी” आयोजित राष्ट्रीय परिषद – जून, २०२३ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे…

0
288

अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर आणि उप सभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई, दि २६ मे, २०२३ (पीसीबी) : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे या संस्थेतर्फे दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान “राष्ट्रीय विधिमंडळ सदस्य (विधायक) संमेलना”चे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या अधिकाधिक सन्माननीय सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले आहे. आज दिनांक २६ मे रोजी यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी “एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे”चे संस्थापक आणि या उपक्रमाचे आयोजक श्री. राहुल कराड आणि उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची दृक्श्राव्य माध्यमाद्वारे वार्ताहर परिषद (ऑनलाईन) आयोजित करण्यात आली. यावेळी दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान या परिषदेत आयोजित करण्यात आलेले विविध विषयांवरील सत्र तसेच उद्घाटन सोहळ्याला लाभणारी लोकसभा अध्यक्ष मा.श्री. ओम बिर्ला यांची उपस्थिती याबाबत श्री. राहुल कराड यांनी माहिती दिली.

“जीओ कन्व्हेंशन सेंटर – बीकेसी, मुंबई” येथे ही तीन दिवसीय परिषद “एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे” तर्फे आयोजित करण्यात आली असून देशातील सर्व राज्य विधानमंडळांच्या सन्माननीय सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तसेच जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या विधिमंडळाचे कामकाज आणखी प्रभावी होणे, लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न आणखी सुयोग्यरित्या सभागृहात मांडता यावेत यादृष्टीने प्रबोधन, विकासोन्मुख धोरणनिश्चितीमध्ये सर्वांचा सहभाग आणि सर्वांचा विकास, यादृष्टीने या परिषदेतील विचारमंथन यापुढील काळात सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा विश्वास या वार्ताहर परिषदेत बोलतांना विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मा.श्रीमती सुमित्रा महाजन, मा. डॉ. मीरा कुमारी, अध्यक्ष मा. श्री. शिवराज पाटील-चाकुरकर, मा.श्री. मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन देखील या तीन दिवसीय परिषदेत लाभणार आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांनी या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी-मार्च, २०२३ मध्ये दोन्ही सभागृहात मा. पीठासीन अधिकारी यांनी यासंदर्भातील घोषणा देखील केली आहे. या दृक्श्राव्य वार्ताहर परिषदेत (ऑनलाईन) विधानपरिषदेचे माजी सभापती मा. श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, श्री. कपिल पाटील, वि.प.स., विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे, सचिव- २ (कार्यभार) डॉ. विलास आठवले, मा. उप सभापती यांचे खाजगी सचिव श्री. रविंद्र खेबुडकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री. निलेश मदाने, एमआयटीचे श्री. अण्णासाहेब टेकाळे आणि पत्रकार सहभागी झाले. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरात परिषदेतील विविध सत्रांचे विषय आठ दिवस अगोदर सर्वांना उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले.