महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) च्या अध्यक्षपदी डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि सचिवपदी डॉ. संजय जाधव यांची निवड

0
323

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. यावेळी पुढील पाच वर्षाची नवीन कार्यकारिणी करीता निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पुण्यातील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांची अध्यक्षपदी, तर मुंबईच्या डॉ. संजय जाधव व डॉ. प्रशांत लोखंडे यांची अनुक्रमे सचिवपदी व कार्यकारी संचालक पदी निवड करण्यात आली. तसेच पुण्याच्या प्रा. मनोज खळदकर यांची उपाध्यक्षपदी (पुणे विभाग), प्रा. विराज बर्गे यांची कोषाध्यक्षपदी, प्रा. स्वाती मोरे यांची महिला प्रतिनिधीपदी व प्रा. दिपक पवार यांची नियामक मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, डिप्लोमा, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्ट, कॉमर्स, सायन्स इत्यादी महाविद्यालयातील सुमारे ५०० सदस्यांपैकी उपस्थित असलेल्या २१५ पेक्षा अधिक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सनी या निवडणुक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
माटीपीओ ही राज्यस्तरावरील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरची संघटना आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील व देशातील बेरोजगार युवकांकरिता विविध रोजगार भरती मेळावे व १५९ पेक्षा जास्त कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात येते. मागील पाच वर्षात १५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माटीपीओने रोजगार मिळवून दिला आहे.

तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ॲप्टीट्यूड स्किल व प्रोग्रामिंग स्किल वाढावे व पर्यायाने त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढून त्यांना चांगला रोजगार मिळावा याकरिता माटीपीओतर्फे दरवर्षी ॲप्टीट्यूड आयडॉल व प्रोग्रामिंग आयडॉल या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये राज्यभरातून सुमारे ४० हजार विद्यार्थी सहभागी होतात. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्रीतील कार्यप्रणाली इत्यादीं बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी याकरीता माटीपीओने मागील पाच वर्षात ७० इंडस्ट्रीतील तज्ञ मार्गदर्शकांचे सेमिनार आयोजित केले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी हा रोजगार देणारा देखील व्हावा या अनुषंगाने विविध उद्योजकता विकास कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बदलते तंत्रज्ञान, कॅम्पस प्लेसमेंट मधील बदलते ट्रेंड, कंपनीच्या विद्यार्थ्यांकडून वाढणाऱ्या अपेक्षा इत्यादी बाबतीत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर हा अद्ययावत असावा या दृष्टीने माटीपीओ तर्फे दरवर्षी टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन देखील करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व टीपीओंकरीता विविध कंपन्यातील तज्ञ मार्गदर्शकांच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते.

प्रा. डॉ. रवंदळे यांची माटीपीओ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.
माटीपीओ च्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या