मुंबई,दि.३१(पीसीबी) – महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली जात आहे. ही टीका होत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचा दावा केला. यासाठी त्यांनी पुरावा म्हणून काही जुन्या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला फॉक्सकॉन प्रकल्प आणि वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प पूर्णपणे वेगळे असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, “पत्रकार परिषदेत एवढं खोटं बोलल्याचं मी कधीही ऐकलं नव्हतं किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्पाबाबत २०१६ साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती.”
“पुढे या प्रकल्पाने तामिळनाडूमध्ये चाचपणी केली आणि हा प्रकल्प अमेरिकेत गेला. आता त्याठिकाणी उत्पादन सुरू आहे. हा प्रकल्प जरी फॉक्सकॉन कंपनीचा असला तरी यामध्ये आणि वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदान्त फॉक्सकॉनचा प्रकल्प ‘सेमीकंडक्टर चिप’साठी होता. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेला प्रकल्प ‘मोबाईल’ फोनसाठी होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती असेल की, कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचं सोडून द्या. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सोडून द्या. दोन्ही वेगळे प्रस्ताव आहेत” अशी गंभीर टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.