महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती

0
238

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – कल्याण मधील उल्हासनगर मध्ये भाजपाचे आमदार गणपत पाटील यांनी कल्याण शहर शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये सीनियर पोलीस इन्स्पेक्टर च्या समोर, गोळीबार करून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली नाही हेच सिद्ध केलेले आहे, असे मत स्वराज अभियान महाराष्ट्रचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी व्यक्त केले.

प्रसिध्दिपत्रात कांबळे म्हणतात,चार दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये असे वक्तव्य केले होते की, कार्यकर्त्यांनी कुठलीही भीती न बाळगता आपल्या विरोधकांच्यावर हल्ले करा आपला बॉस ‘सागर’ वर राहतो सागर बंगल्यावर, याचा अर्थ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. हा सरळ सरळ कार्यकर्त्यांची माथी भडकवण्याचा प्रकार असून निवडणुका समोर ठेवून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत पसरवा, लोकांना भीतीच्या सावटाखाली ठेवा अशा प्रकारचा संदेश ते कार्यकर्त्यांना देऊ पाहत होते, अर्थात या सर्व गोष्टींना गृहमंत्री असलेले आणि भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याशिवाय नितेश राणे सारखा आमदार असे वक्तव्य करूच शकत नाही.
सध्या राज्यामध्ये जातीच्या धर्माच्या नावावर विध्वंस निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक केले जात आहे, असा आमचा भारतीय जनता पक्षावर स्पष्ट आरोप आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरी सरकार अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत याचे अनेक दाखले देता येतील.
कल्याण उल्हासनगर मध्ये घडलेली घटना ही अतिशय गंभीर असून सत्ताधारी पक्षाचा आमदारच असे गुन्हेगारी कृत्य करत असेल आणि तो हल्ला सुद्धा सत्तेमध्ये असलेल्या दुसऱ्या पक्षाच्या एका नेत्यावर हे पाहिल्यानंतर याची भयानकता लक्षात येऊ शकते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत एक वक्तव्य केले आहे की “कायदा सर्वांना समान आहे, यामध्ये दोषी व्यक्तींवर निष्पक्षपातीपणे कारवाई केली जाईल. परंतु त्याच बरोबर ते पुढे असे म्हणाले आहेत की, “अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये आमदाराला गोळीबार का करावा लागला, याचीही चौकशी केली जाईल” या वक्तव्याचा गर्भित इशारा असा आहे की देवेंद्र फडणवीस हे भाजप आमदार गणपत पाटील यांना वाचवण्याचा १०० टक्के प्रयत्न करणार. सध्या राज्यातील सर्व शहरी भागांमध्ये गुंडांचे साम्राज्य सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्याने निर्माण केले जात आहे. पुण्यामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली, आणि या गुंडाची पत्नी भारतीय जनता पक्षाची प्रमुख पदाधिकारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राजरोजपणे गुंडांना भेटायला जातात, हे सगळ्यांनी पाहिले आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारची आणि विशेषतः गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. गुन्हेगारांना योग्य वेळी योग्य शासन झाले नाही तर राज्यामध्ये अराजक निर्माण होऊ शकते अशी साधार भीती आम्हाला वाटत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा विजय व्हावा यासाठी अशा पद्धतीची दहशत वाढवण्यासाठी म्हणून अशी कृत्ये सत्ताधाऱ्यांकडून केली जातात, असा आमचा स्पष्ट आरोप आहे.

कल्याणचे आमदार गणपत पाटील यांना ताबडतोब आमदार पदावरून हाकलले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे करणे शक्य नसेल तर राज्याची कायदा सुव्यवस्था आपण व्यवस्थित राहू शकत नाही असे मान्य करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी स्वराज अभियान’च्या वतीने करण्यात येत आहे.