महाराष्ट्राने राजकारण – समाजकारणाची कूस बदलली

0
44

मुंबई, दि. 06 (पीसीबी) :  महाराष्ट्रावर तथाकथित पुरोगामी विचारांचा जणू काही गंज चढला होता. हा गंज हिंदू समाजानेच पुसून काढून अस्सल आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचे अभूतपूर्व प्रकटीकरण केले. महाराष्ट्र हा हिंदूविरोधी शक्तींचा वैचारिक स्त्रोत मानला जात असे. या स्त्रोतावरच निर्णायक घाव घालून हिंदू समाजाने आपले ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले आहे.

महाराष्ट्रामधे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणाच्यादृष्टीने ही घटना अत्यंत लक्षणीय आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे गेल्या दहा वर्षात राजकारणात अनेक सकारात्मक बदल झाले. परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर हा बदल अत्यंत ठळकपणे अधोरेखित झाला आहे.

महाराष्ट्राने एक भली मोठी कूस बदलून आपले वास्तव आणि अत्यंत नितळ स्वरूप धारण केले आहे. महाराष्ट्राचे वर्णन नेहमी `पुरोगामी’ राज्य म्हणून केले जाते. `पुरोगामी’ आणि `प्रतिगामी’ म्हणजे काय, या वादात पडण्याची गरज नाही. परंतु तथाकथित पुरोगामी मंडळीनी पुरोगामीत्वाच्या नावाखाली महाराष्ट्रामधे गेली सहा दशके उच्छाद मांडला होता. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असा घोष करीत, ते सोयीस्करपणे शिवरायांना विसरले होते. शाहू फुले, आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना कोणताही आक्षेप नाही. परंतु त्यांचे कार्य आणि विचार यांना विकृतपणे प्रसारित करून महाराष्ट्राची वैचारिक दिशाभूल करण्यात येत होती. यामुळे महाराष्ट्राच्या तीन-चार पिढ्या नासविल्या गेल्या. प्रसंगी खोटा आणि रचित इतिहास सांगितला गेला. परिणामी, तथाकथित पुरोगामी महाराष्ट्र जातीपातीत विभागला गेला. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने बेजबाबदार आणि असंवेदनशील राजकारण करून जातीपातीची धग कायम पेटत ठेवली. कॉंग्रेस आणि अल्पसंख्यांक, डावे यांनी त्यांची सेवा पवार यांच्या चरणी रुजू केली. या कळपात उद्धव ठाकरेसुद्धा सहभागी झाले आहेत. अगदी अलीकडे आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात विखारी आणि विषारी वातावरण तयार करून हिंदू ऐक्यावर आघात करण्याचे गंभीर प्रयत्न झाले. हे विष गावपातळीवर एवढे भिनवले गेले की, शाळेतील लहान लहान मुलेसुद्धा या घातक प्रचाराचा बळी ठरली. हे दुर्दैवी चित्र अत्यंत चिंताजनक होते आणि आहे कारण त्यामुळे हिंदू एकतेवर गंभीर परिणाम होणार होते. या प्रकारामागे डावे, पुरोगामी, अर्बन नक्षल, उदारमतवादी आणि कॉंग्रेस विचार संस्कृतीमधे वाढलेली पिलावळ सामील होती. फुले, शाहू आणि आंबेडकर यांना अशा प्रकारचे सामाजिक वातावरण कधीही अपेक्षित नव्हते. मात्र, त्यांची नावे घेत मराठी जनतेची घोर फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सहा दशके अव्याहत चालू होता आणि महाराष्ट्र तथाकथित पुरोगामी विचारांच्या शृंखलात अडकला होता. या वैचारिक गुलामगिरीतून स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेला तीन दशकांपूर्वी प्रारंभ झाला.

आज महाराष्ट्राने या वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या दिशेने एक मोठी आणि निर्णायक झेप घेतली आहे. सर्व प्रकारच्या जातीय जाणिवा बाजूला सारून महाराष्ट्राने निखळ आणि अस्सल हिंदुत्वाला फार मोठा कौल दिला आहे.
हिंदू ऐक्याच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत मराठी जनतेने दाखवून दिले आहे की, आम्हाला स्वार्थी, समाज विघातक आणि दुही निर्माण करणारे समाजकारण आणि राजकारण मंजूर नाही. महायुतीला सर्व प्रकारच्या समाज घटकातून मते मिळाली. सर्व भौगोलिक क्षेत्रातून हिंदुत्वाला प्रतिसाद मिळाला. महायुतीला मिळालेल्या जागा आणि मविआची झालेली धूळधाण लक्षात घेता, असाच निष्कर्ष निघतो की, जनतेला हिंदुत्वाविषयीच आस्था आणि प्रेम आहे. या समाजमानसाचे राजकीय प्रकटीकरण विधानसभा निवडणुकीत झाले. देव, देश आणि धर्म हाच महाराष्ट्राचा अस्सल डी.एन.ए आहे, याची सुखद आणि उत्साहवर्धक प्रचिती या निवडणुकीत दिसून आली.

राजकीयदृष्ट्या विचार केला तरी, हिंदुत्व हेच महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असल्याचे गेल्या दहा वर्षात दिसून येते. गेली दहा वर्षे भाजप हाच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. या पूर्वी कॉंग्रेस आणि कॉँग्रेससप्रणित डावे महाराष्ट्रावर वैचारिक हुकमत गाजवित होते. त्यांचे प्रकटीकरण मतपेटीतून होत असे. परंतु, २०१४ पासून हे चित्र आमूलाग्र बदलले. आज ठाकरे आणि भाजप यांच्यात अंतर असले तरी त्यांना एकत्र बांधणारा धागा हिंदुत्वाचाच होता, हे वास्तव आहे. उद्धव यांना पुढे दळभद्रीचे आकर्षण वाटले आणि ते पथभ्रष्ट झाले. हिंदुवाची कास सोडल्यानंतर त्यांची अवस्था आज अत्यंत केविलवाणी झाली आहे. ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश फसवेच होते. दारुण पराभावानंतर त्यांना आज पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली आहे. परंतु हे हिंदुत्वाचे प्रेम सत्तेसाठीच असल्याचे जनता जाणून आहे. हिंदूविरोधी कॉँग्रेस आणि शरद पवार यांना तर मतदारांनी असा काही धडा शिकवला आहे की, त्यांना या पराभवातून सावरायला खूप अवधि लागेल. पवार कितीही नास्तिक असले तरी देवदेवतांची टिंगल करणाऱ्या या माणसाला जणू काही देवानेच शिक्षा दिल्याचे मानले जात आहे. सुप्रिया सुळे वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांमधून जणू काही अदृश्य झाल्या आहेत. या उलट, अजित पवार यांना हिंदुत्ववादी मते सहज मिळाल्याचे दिसून येते. केवळ हिंदुत्ववादी पक्षांशी युती केल्यामुळेच अजित पवार यांना लक्षणीय यश मिळाले आहे. अनेक हिंदूविरोधी नेत्यांना जनतेने धूळ चारली आहे. त्यामधे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब थोरात आणि राजेश टोपे यांच्यापासून यशोमती ठाकुर यांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आता जिवंत राहण्यासाठी झगडावे लागेल. सातत्याने हिंदूविरोधी भूमिका घेतल्यामुळे दलित मतदारांनीसुद्धा त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. राखीव जागासुद्धा महायुतीने मोठ्या प्रमाणावर जिंकल्या आहेत.

या सर्वांचा अर्थ एकच आहे. हिंदू ऐक्याचे अभूतपूर्व दर्शन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झाले आहे. महाराष्ट्रावर जणू काही तथाकथित पुरोगामी विचारांचा गंज चढला होता. हा गंज हिंदू समाजानेच पुसून काढून लखलखते, तेजपुंज आणि समरसतापूर्ण अस्सल हिंदुत्वाचे प्रकटीकरण केले आहे. ही निवडणूक केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्यादृष्टीने महत्वाची आहे कारण महाराष्ट्र म्हणजे जणू काही हिंदूविरोधी शक्तींचा वैचारिक स्त्रोत मानला जात होता. या स्त्रोतावर निर्णायक घाव घालून समस्त हिंदू समाजाने आपले ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले आहे.

– सत्यजित जोशी