महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल

0
81

लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवत शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती, जाती-धर्माच्या वादापलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणा्या समस्या सोडवण्यासाठीआघाडी कटीबद्ध होती. ह्या भुमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि म. वि. आ. वर विश्वास दाखवला याबद्धल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भुमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ह्या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे. ह्यात महाराष्ट्राची प्रमुख भुमिका आहे. याबद्ल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काहीपावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू. अतिशय संघर्षपूर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली. त्याबदल जनतेचे मी पुन्हा ऋण व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील असंख्य कार्यकत्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबदल त्यांचे मन: पुर्वक अभिनंदन करतो असेही त्यांनी नमूद केले.