महाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..

0
297

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : हैदराबाद येथे आजपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि १९ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकिपूर्वी भाजपाला तेलंगणा आणि राजस्थान ही दोन राज्या ताब्यात घेण्याची घाई झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ भाजप नेतृत्व, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह शनिवार आणि रविवारी हैदराबाद येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माधापूर येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. दोन दिवसीय बैठकीत 300 हून अधिक राष्ट्रीय नेते सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, भाजपने 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये मोठ्या जाहीर सभेचे नियोजन केले आहे.

ओडिशा भाजपचे अध्यक्ष समीर मोहंती, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते के.के. शर्मा, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि इतर बडे भाजप नेते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पूर्वी हैदराबादला पोहोचले.

भाजप खासदार अनिल बलूनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात पक्षाकडून कोणती पावले उचलली जातील यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीच्या अजेंड्यामध्ये पक्षाचा विस्तार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि पक्षाच्या नवीन धोरणांवर चर्चा करणे समाविष्ट आहे. यासोबतच देशातील कोणत्या भागात अधिकाधिक कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची गरज आहे, यावरही चर्चा केली जाणार आहे.

बैठकीदरम्यान छायाचित्रांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे आणि यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका प्रदर्शित करण्यात येणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलैला हैदराबादला पोहोचणार आहेत. ते या सभेला संबोधित करू शकतात, अशीही माहिती आहे.

हैदराबाद येथे 2 आणि 3 जुलै रोजी होणार्‍या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी भाजपची तेलंगणाचे युनिट तयारी करत आहे. विशेष म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर हे संमेलन हैदराबादमध्ये होणार आहे. यापूर्वी 2004 मध्ये हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती.

ही बैठक तेलंगणासाठी महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे, कारण भाजपने आपल्या ‘मिशन दक्षिण’ अजेंड्याखाली येथे बैठक घेण्याचे ठरवले आहे. भाजप दक्षिणेत आपला मतदारसंख्या मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर तेलंगणामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.