मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र सरकार आणि एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स (ब्लॅकस्टोन ग्रुप) यांच्यामध्ये महाराष्ट्रातील 10 हून अधिक अत्याधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कच्या विकासासंदर्भात मैलाचा दगड ठरणारा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग सचिव आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
या कराराअंतर्गत नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर आणि पनवेल या ठिकाणी 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत. यासाठी 794.2 एकर जागेवर 1.85 कोटी चौ. फूट बांधकाम होणार असून, एकूण ₹5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार आहे. यामुळे 27,500+ थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील.
हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 शी सुसंगत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भागीदारी औद्योगिक व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील परिवर्तनाचे पाऊल असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.